म्युझिकल फौंऊटेनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे काम करा; पाहणी दरम्यान आ.क्षीरसागर यांच्या मनपा अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना

कोल्हापूर  : गेल्या दोन – तीन वर्षापासून ऐतिहासिक रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या होत असलेल्या विकास कामांमुळे पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली. सद्यस्थितीत रंकाळा तलावात म्युझिकल फौंऊटेन बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या म्युझिकल फौंऊटेनच्या कामात आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्यांच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड नको, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

 

 

 

 

रंकाळा तलाव येथे सुरु असलेल्या कामाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत पाहणी केली.

ते पुढे म्हणाले, कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. यासह शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे हक्काचे विरंगुळा केंद्र म्हणजे रंकाळा तलाव आहे. या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. कोल्हापूरच्या पर्यटनात भर घालणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याने तो शहराच्या वैभवात भर टाकणारा असावा. म्युझिकल फौंटनचे काम हे जागतिक दर्जाचे आणि दर्जेदारच झाले पाहिजे. त्यात तांत्रिक त्रुटी किंवा निकृष्ट साहित्य वापरले गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.

काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रातून यामध्ये चायना मटेरियल वापरले जाणार असल्याचे प्रसिद्ध झाले होते. यामुळे प्रकल्पाची आणि लोकप्रतिनिधींची नाहक बदनामी होते. याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी धारेवर धरले. हे काम जागतिक दर्जाचे असल्याने परदेशातून काही साहित्य मागविले जाणार असेल तर त्याचा दर्जाचा योग्य असावा. यामध्ये कोणतेही चायना मटेरियल दिसता कामा नये. आलेल्या साहित्याचे सर्टिफिकेशन करूनच त्या साहित्याचा वापर प्रकल्पात करावा. प्रकल्पाच्याबाबतीत कोणतीही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. बसविण्यात येणाऱ्या फौंऊटेनची जागा योग्य असावी, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना याचा आनंद घेता येईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पर्यटकांच्या गर्दीत वाढ होणार आहे त्यामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे काम करा, अशा सूचना दिल्या.

 

*राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करणार : आमदार क्षीरसागर*

महायुती शासनाच्या काळात कोल्हापुरात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे. कोल्हापूर सांगली पूरनियंत्रण प्रकल्प, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नुतनीकरण, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ, गांधी मैदान ड्रेनेज लाईन, रंकाळा तलाव म्युझिकल फौंऊटन, शहरातील तालीम संस्था बांधकाम अशी अनेक विकास कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांची २६ जून रोजी जयंती साजरी होणार असून, या निमित्ताने मुखमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या विकास कामांचे लोकार्पण करण्याचा उद्देश असून, अधिकाऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, अतिरिक्त आयुक्त रमाकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, अभियंता फुलारे आदी उपस्थित होते.

 

🤙 8080365706