सीपीआरमधील ‘संपूर्ण सुरक्षा कक्षा’चा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन • एकही एचआयव्ही संक्रमित पाठपुराव्यापासून वंचित राहू नये • जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती आढावा बैठक

कोल्हापूर : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही आणि सिफिलीस प्रतिबंधात्मक मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे सज्ज असलेल्या ‘संपूर्ण सुरक्षा कक्षा’च्या महत्त्वावर प्रकाश टाकला. यासह जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमित असलेल्या व उपचाराखाली असलेल्यांपैकी एकही व्यक्ती पाठपुराव्यापासून वंचित राहू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. तसेच या कार्यात अशासकीय संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

 

 

 

सीपीआर येथील त्वचा व गुप्तरोग विभागातील कक्ष क्रमांक ३१९ येथे हा ‘संपूर्ण सुरक्षा कक्ष’ कार्यरत आहे. या कक्षात लैंगिक संक्रमित आजार आणि प्रजनन मार्गातील संसर्गाबाबत समुपदेशन, मोफत निदान व उपचार केले जातात. सिफिलीस हा जीवाणूंमुळे होणारा संसर्ग असून वेळेत उपचार न मिळाल्यास तो शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचवू शकतो. या कक्षात समुपदेशक श्रीया पाटील यांच्याकडून नागरिकांना मार्गदर्शन केले जाते. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जात असल्याने संशयित लक्षणे असलेल्या व्यक्तींनी कोणत्याही भीतीशिवाय येथे येऊन तपासणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

वर्ष २०२५-२६ या कालावधीत तब्बल २८ हजार १४९ नागरिकांनी या केंद्रात तपासणी केली असून, त्यापैकी ११२ व्यक्तींना सिफिलीसचे निदान झाले आहे. या सर्व रुग्णांवर सध्या योग्य उपचार सुरू आहेत. सिफिलीस असलेल्या रुग्णांना असुरक्षित संबंधांमुळे एचआयव्ही होण्याचा धोका अधिक असतो, त्यामुळे जोखीम गटातील व्यक्तींनी वेळेत तपासणी करणे गरजेचे आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात १ लाख ३९ हजार ६३० एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये केवळ ०.३ टक्के (४८३ व्यक्ती) संक्रमित आढळल्या आहेत. या सर्वांचा ‘व्हायरल लोड’ शून्यावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामगिरीचे कौतुक करताना सांगण्यात आले की, ७१ हजार ९७८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १९ माता पॉझिटिव्ह आढळल्या असल्या तरी, प्रभावी उपचारामुळे मागील वर्षात एकाही बालकाला एचआयव्हीचे संक्रमण झालेले नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी सर्व संक्रमित व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांचे योग्य समुपदेशन करण्याचे आणि उपचारात खंड पडणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात अनेक रुग्ण २५ ते ३० वर्षांपासून योग्य उपचार घेऊन सामान्य जीवन जगत असल्याचे सकारात्मक उदाहरणही यावेळी जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे यांच्याकडून मांडण्यात आले.

या बैठकीला प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, शिल्पा आष्टेकर, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत रेवडेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांच्यासह कोल्हापूर एड्स नियंत्रण कक्षातील अधिकारी व विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000

🤙 8080365706