स्वयंभूवाडी:करवीर विधानसभा मतदार संघातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा विजय हीच स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या माध्यमातून स्वर्गीय कै. पी एन पाटील साहेब आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेला आदर आपण सर्वांनी व्यक्त करूया आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला अन्याय भरून काढूया, असेही ते म्हणाले.
स्वयंभूवाडी ता. करवीर येथे श्री. स्वयंभू मंदिरात करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार शुभारंभात श्री. मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, स्वर्गीय कै. पी एन. पाटीलसाहेब यांच्या पश्चात राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण राष्ट्रवादीमध्ये आलेले आहात. हा पक्ष तुमच्यासाठी परका नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह आम्ही सर्वजणच तुमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. राहुल पाटील यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार म्हणजे होणार. या जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व बारा वाड्यांचे प्रश्न निकालात काढू. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. या निवडणुकीतून ज्यांना माघारी घ्यावी लागली, थांबावे लागले त्यांच्यावरील अन्याय निश्चितच दूर करून त्यांना न्याय देऊ. लाडक्या बहिणींना दरमहा रू. २१०० देऊ.
जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर म्हणाले, या परिसरातील वाड्या वस्त्यांपासून गावागावांपर्यंत विकासामध्ये स्वर्गीय कै. पी. एन. पाटीलसाहेब यांचे योगदान मोठे आहे. या भागातील जनतेनेही त्यांना नेहमीच ताकद दिली. त्यांच्या जाण्यानंतर ही जनता माझ्याही पाठीशी भरभक्कमपणे उभी राहिली. यापुढेही जनता या सर्व उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील.
पी. एन. साहेबांना शेतकऱ्यांची आस्था आणि प्रेम
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, आज स्वर्गीय कै. पी. एन. पाटीलसाहेब यांची आठवण तीव्रतेने येत आहे. त्यांचा आणि माझा राजकीय आणि सामाजिक उदय एकाचवेळी झाला. ते केडीसीसी चे संचालक झाले, त्याचवेळी मीही केडीसीसीचा संचालक झालो. सन १९५३ हे आमच्या दोघांचेही जन्म वर्ष एकच. त्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रचंड आस्था आणि प्रेम होते. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत- जास्त सेवा आणि सोयीसुविधा कशा मिळतील, यासाठी ते आग्रही असत. परंतु; आपणा सर्वांनाच ते पोरके करून गेले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नावाचा उल्लेख “आपल्या सर्वांचे नेते आणि भावी आमदार” असा करताच उपस्थित आणि टाळ्यांचा कडकडाट केला.
मतांसाठीच पी. एन. साहेबांच्या फोटोचा वापर…..!
राहुल पाटील म्हणाले, आज अनेक उमेदवारांच्या प्रचार पत्रकांवर आणि बोर्डांवर आमदार कै. श्री. पी. एन. पाटीलसाहेब यांचे फोटो येत आहेत. परंतु हे त्यांचे प्रेम किंवा निष्ठा नव्हे. त्यांचा फोटो लावला की मते मिळतील या स्वार्थातूनच त्यांचा हा खटाटोप आहे. जे पी. एन. साहेबांशी निष्ठावंत आहेत, ते सर्वजण आम्हा कुटुंबीयांसमवेत राष्ट्रवादीत आहेत. आजवर या भागात झालेली विकासकामे कै. श्री. पी. एन. पाटीलसाहेब व त्यांच्या कार्यकर्त्यांनीच केलेली आहेत. पी. एन. साहेबांचे शिलेदारच या भागाचा विकास करू शकतात.
सांगरूळ जिल्हा परिषद मतदार संघ उमेदवार सौ. रेखाताई प्रकाश मुगडे, सांगरूळ पंचायत समिती मतदार संघ उमेदवार सौ. मेघा आनंदराव नाळे व बहिरेश्वर पंचायत समिती मतदार संघ उमेदवार सौ. लता सूर्यकांत दिंडे यांचीही भाषणे झाली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, शंकरराव पाटील, महेश पाटील, संतोष पोरलेकर, शिवाजीराव देसाई, भाजपच्या सरचिटणीस सौ. सुशीलाताई पाटील, कृष्णात चाबूक, सचिन पाटील, शामराव सूर्यवंशी, सुभाष सातपुते, प्रकाश पाटील, डॉ. सुरेश मोरे, विलास पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
