मुंबई:सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मंत्रालयातील समिती सभागृहात नुकतीच सविस्तर आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत व डॉ. सरिता हजारे यांच्यासह राज्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
याप्रसंगी आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे आणि डॉ. मोहन जाधव यांनी कर्मचारी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा स्तरावरील संस्थांमधील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना अत्याधुनिक व उपयुक्त प्रशिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्यातील प्रशिक्षण संस्थांचा दर्जा इतका उच्च असावा की, परराज्यांतील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रात येण्याची इच्छा व्हावी, हे ही ठळकपणे नमूद केले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी (THO) हे पद राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा असल्याचे नमूद करत या पदास अधिक सक्षम करण्यावर भर देण्यास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले, ज्यामुळे एकूण आरोग्य व्यवस्था सुदृढ होण्यास मदत होईल. या प्रशिक्षण आराखड्यात तालुका आरोग्य अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांचा प्रामुख्याने समावेश करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. बैठकीच्या शेवटी, पद संवर्गनिहाय प्रशिक्षणाचा सविस्तर आराखडा तयार करून तो एका महिन्याच्या आत मान्यतेसाठी सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
