मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विमानतळाशी संबंधित विषयांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेले केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विमानतळाशी संबंधित विविध विषयांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यामध्ये प्रामुख्याने उजळाईवाडी ते नेर्ली तामगाव या रस्त्यासंदर्भात चर्चा झाली. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.11 किलोमीटरचा वळसा घालून नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थी वर्गाला ये-जा करावी लागते. त्यामुळे पर्यायी मार्गाची व्यवस्था होईपर्यंत हा रस्ता हलक्या वाहनांसाठी आणि दुचाकी वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे मंत्री महोदयांकडे केली. यावर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही नामदार मोहोळ यांनी दिली. याचबरोबर कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी मंत्री महोदयांकडे केली. कोल्हापुरातून लवकरात लवकर कार्गो सेवा सुरू व्हावी तसेच विमानतळ विस्तारीकरणासाठी खाजगी वाटाघाटीने संपादित करावयाच्या जमिनींचे प्रलंबित दस्त पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी यावेळी मंत्री महोदयांकडे केली. या मागण्यांचा सकारात्मक विचार करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन नामदार मुरलीधर मोहोळ यांनी दिले. याप्रसंगी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक ,आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545