कोल्हापूर : आज कोल्हापूर विमानतळावर नवीन ATC टॉवर, तांत्रिक ब्लॉक, व अग्निशमन केंद्राचे लोकार्पण तसेच स्टार एअरच्या कोल्हापूर – नागपूर विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला.ही सुविधा केवळ कोल्हापूरच नाही, तर संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक पाऊल आहे. आता कोल्हापूर ते नागपूर हे अंतर अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.
या ऐतिहासिक प्रसंगी तीन महत्त्वाच्या मागण्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडे खासदार धैर्यशील माने यांनी मांडल्या:
धावपट्टीचा विस्तार लवकरात लवकर सुरू करावा, जेणेकरून कोल्हापूर विमानतळाची दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.
औद्योगिक क्षेत्राला बळ देण्यासाठी स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारण्यात यावे.
(ऑटोमोबाईल, फाउंड्री व कापड उद्योगासाठी अत्यंत आवश्यक)
कोल्हापुरात उड्डाण प्रशिक्षण शाळा स्थापन व्हावी, जेणेकरून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ , खासदार श्रीमंत शाहू महाराज, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने बापू, जिल्हाधिकारी राहुल रेखावर आदी समवेत सर्व अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.