कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे वक्तव्य महायुतीचे नेते करत आहेत. त्यांना जनमत मिळेल की नाही अशी शंका असल्यानेच ते अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत कोल्हापुरात शक्य होईल तिथे महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार पाटील म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका राज्य सरकारला घ्याव्याच लागतील. पावसाळ्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी राज्य शासन घेऊ शकते काय? अशी शंका आमच्याही मनात आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारने सर्व पक्षांना बोलवून चर्चा करावी.
महायुतीची सत्ता आल्यापासून कारभार वाईट सुरु आहे. त्यामुळे जनमत मिळल की नाही ही शंका महायुतीला असल्यानेच ते निवडणुका घेण्याबाबत चालढकल करत असल्याची टीका त्यांनी केली.
