मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव “स्पंदन 2025” कार्यक्रमाचे उद्घाटन

कोल्हापूर : सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव “स्पंदन 2025” या कार्यक्रमाचे उद्घाटन बैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर नगरी हि दक्षिण काशी म्हणून विख्यात आहे. कणेरी मठ या मठाला साधारणतः १५०० वर्षापेक्षा अधिक प्राचीन परंपरा आहे. मठाचे मठाधिपतीकाडसिद्धेश्वर स्वामीजींनी या मठाला आध्यात्मिकतेसोबतच सामाजिक कामाची जोड दिल्यामुळे हा मठ सामाजिक कार्यासाठी देशभरात ओळखला जातोय. याचा मला अभिमान आहे. असे मत मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

मुश्रीफ म्हणाले, स्वामीजींच्या अथक प्रयत्नातून इथे विविध सामाजिक उपक्रम सतत सुरु आहेत. सेंद्रिय शेतीसाठी स्वामीजींनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. आज हजारो अनाथ मुलांना दत्तक घेवून स्वामीजींनी अनेक कुटुंबातील मुलांना अधिकारी केलेले आहे. कोल्हापूर जिल्हयातील अनेक जिल्हा परिषद शाळा स्वामीजींनी दत्तक घेतल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा पट वाढत आहे. आपती व्यवस्थापनात मठाने फार मोठे कार्य केलेले आहे. नेपाळचा भूकंप असो अथवा केरळचा पूर असो व स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली मठाने उल्लेखनीय कार्य केले आहे. हे कार्य इतके मोठे आहे कि, केरळचे राज्यपाल असे कार्य करणारा मठ मला पहायचा आहे म्हणून इथे मठावर आले होते. भारतीय गोवंशातील ३४ प्रकार पैकी २७ प्रकारच्या गाई इथे पाहायला मिळतात. गोरगरीब लोकांना चांगल्या सुविधा याव्यात म्हणून चालवलेले हॉस्पिटल गरीब रुग्णांच्यासाठी संजीवनी ठरत आहे.
मठाने काढलेल्या नर्सिंग महाविद्यालयात शिकून हजारो लोक आज आपल्या पायावर उभी आहेत. याच नर्सिंग महाविद्यालयाचा ‘स्पंदन २०२५’ हा सांस्कृतिक कार्यक्रम या सांस्कृतिक नगरीत संपन्न होत आहे, याचा मला आनंद आहे. भविष्यात हि या ठिकाणी विद्यापिठाचे अनेक कार्यक्रम व्हावेत अशी माझी इच्छा आहे. या ठिकाणी वैद्यकीय शिक्षणाच्या अनेक शैक्षणिक अभ्यासक्रम या ठिकाणी चालू झाल्यास नक्कीच अनेक विद्यार्थी याचा लाभ घेतील असा मला विश्वास आहे. सामाजिक काम करणाऱ्या संस्थेने असे शैक्षणिक अभ्यासक्रम चालवले तर समाजासाठी ते अधिक हितावह ठरते.
यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (मॅडम), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलसचिव राजेंद्र बंगाळ, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. देवेंद्र पाटील यशोवर्धन बारामतीकर, डॉ. वर्षा पाटील, गुंडोपंत वड्ड, प्राचार्य रेगिना सातवेकर, उप कुलसचिव तथा समन्वय कोल्हापूर विभाग महेंद्र कोठावदे यांच्यासह सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट कनेरीचे सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.