मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे अमरावती ग्रामीण पोलीस प्रशासकीय इमारती, निवासस्थान इमारती तसेच शासकीय वाहनांचे उदघाटन व लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 मध्ये येथील प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले होते आणि आज इथे सुसज्ज इमारती उभ्या आहेत. या इमारतींमुळे पोलीस बांधवांना 208 फ्लॅट उपलब्ध होत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ आणि महामंडळाच्या महासंचालक यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 24 तास कर्तव्य बजावूनदेखील पूर्वी पोलिसांना अतिशय वाईट अशा खोपट्यासारख्या घरांमध्ये राहण्याची वेळ येत होती. पण महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला पोलिसांसाठीची घरे बांधण्याचे काम दिले, तेव्हापासून ते चांगल्याप्रकारचे काम करत आहे. या माध्यमातून 2014 नंतर पोलिसांसाठी जास्तीतजास्त घरे बांधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यातून पोलिसांचे जीवनमान सुधारले पाहिजे, असा आपला प्रयत्न आहे. तसेच पोलिसांना हक्काची, स्वमालकीची घरे घेता यावी याकरिता डिजिलोनसारखी योजना सुरु करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांसाठी घरांसोबतच विविध उपक्रमांचे उदघाटन केले. या सर्वांचाच पोलिसिंग करण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास वाटतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 नवीन फौजदारी कायदे आल्यानंतर पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. लोकांना वेगाने न्याय मिळण्यासाठी या कायद्यांची व्यवस्था उभी करण्यात आली आहे, तसेच त्यांचे प्रशिक्षणही पोलिसांना प्राप्त झाले आहे. याद्वारे आपण अतिशय चांगल्याप्रकारे अमरावती शहर, जिल्हा येथे नागरिकांना न्याय मिळण्याकरिता व सुरक्षिततेने जगण्याकरिता काम कराल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, घराच्या चाव्या मिळालेल्या पोलिसांचे व त्यांच्या कुटुंबियांचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, खा. अनिल बोंडे, आ. प्रताप अडसड, आ. संजय कुटे, आ. रवी राणा, वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.