मुंबई : कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील (क्र.१६६) भूसंपादनाची प्रक्रिया चोकाक ते अंकली दरम्यान थांबविण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने ही प्रक्रिया लांबली होती. आता या मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार कोल्हपूर जिल्हाधिकारी यांनी नव्याने प्रस्ताव द्यावा तो मान्यतेसाठी पाठविला जाईल, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजेंद्र यड्रावकर, महसूलचे अधिकारी आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करुन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा. या रस्त्याला यापूर्वी गुणांक १ होता तो आता गुणांक २ करण्यात यावा. अशा पद्धतीने प्रस्तावानुसार या मार्गाच्या भूसंपादनातील अडचणी दूर होतील. सरकार म्हणून तातडीने निर्णय घेण्याची आमची तयारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अत्यंत सकारात्मक पद्धतीने सरकारची कामगिरी सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत योग्य निर्णयापर्यंत आपण पोहचणार असल्याचेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.
खासदारांनी मानले महसूल मंत्र्यांचे आभार
खासदार धैर्यशील माने म्हणाले, गेल्या ३० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरही कोणतीही अडचण न येता हा प्रश्न ३० मिनिटांच्या बैठकीत मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे उपस्थित आणि कोल्हपूर जिल्ह्यातील जनतेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.