कोल्हापूर : मौजे टोप येथील महापालिकेच्या मालकीच्या इनर्ट वेस्ट टाकण्याच्या खणीमध्ये काही नागरीकांकडून वाळू, खडी उपसा होत असलेचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या ठिकाणी आज सहा.आयुक्त कृष्णात पाटील यांनी सकाळी अचानक भेट देऊन येथे बेकायदेशीर वाळू, खडी उपसा सुरु असलेले साहित्य जप्त करण्यात आले. यावेळी खणीमधील वाळु धुण्यासाठी 3 कॉमेट कंपनीच्या मोटर, 4 इंची 500 फुट पाईप व इतर अनुषंगीक साहित्य जप्त करण्यात आले. सदरची कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
मौजे टोप येथे गट नं.520 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीची खण आहे. सदरच्या खणीला कंपौंड घालून बंदीस्त करण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरु आहे. या जमीनीमध्ये विनापरवाना अतिक्रमण करुन बेकादेशीर वाळू धुण्याचा व खडीचा व्यवसाय सुरु होता. सदरचा व्यवसाय बंद करण्याबाबत वारंवार संबंधीतास सूचना देऊनही हा व्यवसाय सुरुच ठेवण्यात आला होता. त्यामुळे आज सदरचे ठिकाणी तालाठींना घेऊन जाऊन जागेवर पंचनामा करुन सदरचे साहित्य जप्त करण्यात आले.
यावेळी सहा.आयुक्त कृष्णात पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील, आरोग्य निरिक्षक स्वप्नील उलपे, तलाठी एस.बी.बाजरी व तालाठी कार्यालयाचे कर्मचारी, आरोग्य व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.