मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विविध डिजिटल पोर्टल्सचे उदघाटन केले. महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ (MBOCW)च्या सेस पोर्टलचे तसेच कामगार विभागाच्या बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टीम (BMMS) आणि बॉयलर परीक्षांसाठी डिजिलॉकर सुविधेचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष 60 वर्षे वय पूर्ण झालेल्या कामगारांसाठी प्रस्तावित पेन्शन योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी या योजनेस तत्त्वतः मंजुरी देत, लवकरच त्यासाठी सविस्तर एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, माथाडी कायद्यात आणि खासगी सुरक्षा रक्षक कायद्यातील सुधारणा महत्त्वपूर्ण असून, त्या कालानुरूप आहेत. तसेच, कामगार विभागाने 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या पुढाकारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री ॲड. आकाश फुंडकर, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री आशिष जयस्वाल व कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.