यज्ञ फौंडैशन यांच्याकडून 75 क्षयरुग्ण दत्तक

कोल्हापूर:भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये आरोग्य समस्यापैकी एक असलेल्या क्षयरोग या घातक अशा वेगाने फैलावणाऱ्या आजाराचे समुळ उच्चाटन सन 2025 मध्ये करण्याचे उद्दीष्ट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे. यासाठी निदान होणाऱ्या सरकारी आणि खाजगी दवाखान्यातील क्षयरुग्णांना निदान, औषधोपचार इ. सर्व सुविधा मोफत पुरविल्या जात आहे. त्याचबरोबर अशा क्षयरुग्णांना पोषण आहार योजनेअंतर्गत दरमहा 500/- रु. अनुदान वितरण केले जाते. परंतु समाजामध्ये काही गरीबगरजु रुग्ण आहेत. ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे सकस आहार घेणे शक्य होत नाही. 

 

 

शिवाय कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस क्षयरोग झाल्यास कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यानुषंगाने सर्व स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक, कंपन्या, दानशुर व्यक्ती, गणेश मंडळे यांनी मदतीचा हात देणेचे महत्वपूर्ण आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. महापालिकेच्या शहर क्षयरोग विभागाच्या या आवाहनास प्रतिसाद म्हणुन ॲड. तन्मय मेवेकरी यांनी निक्षय मित्र म्हणून 75 क्षयरुग्णांना निक्षय पोषण योजना अंतर्गत फुड बास्केट स्वरुपात 6 महिने कालावधीकरीता दत्तक घेतले आहे.  ॲड.तन्मय मेवेकरी हे महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट कोल्हापूर चे अध्यक्ष राजु मेवेकरी यांचे सुपुत्र आहेत.

या फुड बास्केट वाटपाचा कार्यक्रम श्री महालक्ष्मी धर्मशाळा हॉल येथे विविध मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपायुक्त पंडीत पाटील, भा.ज.पा. प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे, जिल्हा अध्यक्ष विजय जाधव, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अमरसिंह पोवार हे उपस्थित होते.

यावेळी ॲड.तन्मय मेवेकरी यांनी प्रस्ताविक करताना यज्ञ फौंडेशन या नव्याने स्थापन झालेल्या स्वयंसेवी संस्थेचा हा पहिलाच उपक्रम असून पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणुन आम्ही 75 क्षयरुग्ण दत्तक घेऊन या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आमचा खारीचा वाटा उचलीत आहोत. यानंतर एस.के.कुलकर्णी यांनी महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्ट, राजु मेवेकरी आणि यज्ञ फौंडेशन यांच्या कार्याचा आढावा यावेळी विषद केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश जाधव यांनी यज्ञ फौंडेशन यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करुन या पुढे देखिल असे नाविन्यपुर्ण उपक्रम राबवावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणेचे आश्वासन दिले. राहुल चिकोडे यांनी कोल्हापूरच्या लौकीकास साजेसा असा हा उपक्रम तरुणांनी आदर्श घ्यावा असे सांगितले. तर विजय जाधव यांनी बोलताना तन्मय मेवेकरी यांनी त्यांनी वडीलाप्रमाणेच समाजोपयोगी उपक्रम राबविले बद्दल विशेष कौतुक केले.

उपायुक्त पंडित पाटील यांनी यज्ञ फौंडेशन आणि तन्मय मेवेकरी यांचे प्रमाणेच समाजातील स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, दानशुर व्यक्ती यांनी गरीब, गरजु क्षयरुग्णांना मदतीचा हात देवून क्षयरोग उच्चाटनाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन केले. आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी क्षयरोग औषधोपचारा बरोबरच सकस आहाराचे महत्व उपस्थितांना विषद केले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मीदास जोशी, कार्यवाहक आदित्य राजु मेवेकरी आणि संस्थेचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.