कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठासमवेत मिड स्वीडन विद्यापीठाचा झालेला करार विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदानाच्या पलिकडे सांस्कृतिक देवाणघेवाणीचा म्हणून अधिक महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन युरोपमधील मिडस्वीडन विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक मॅग्नस हमलगार्ड यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाचा स्वीडनमधील मिड स्वीडन विद्यापीठासमवेत गेल्या नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक व संशोधकीय साहचर्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार झाला आहे. त्या कराराच्या पुढच्या टप्प्यातील अधिक सविस्तर असे करारपत्र आज या दोन्ही विद्यापीठांदरम्यान करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
प्रा. हरलगार्ड म्हणाले, गेल्या दोन दिवसांत शिवाजी विद्यापीठातील अनेक अधिविभागांना भेटी देऊन तेथील प्रयोगशाळा, उपलब्ध संशोधन सामग्री, उपकरणे यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे येथील संशोधक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमवेत झालेल्या चर्चेमधून या दोन्ही विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या विविध संशोधनामध्ये, उपलब्ध सुविधांमध्ये साम्य आढळून आले. त्यामुळे दोन्ही विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकमेकांसमवेत आपले अनुभव वाटून घेऊन आणखी प्रगतीशील संशोधनाच्या दिशा धुंडाळता येऊ शकतील. करारपत्राद्वारे जरी विद्यार्थ्यांचे आदानप्रदान होणार असल्याचे दिसत असले तरी भारत आणि स्वीडन यांच्यामध्ये सांस्कृतिक आदानप्रदान होऊन हे बंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी या करारपत्राच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, या कराराद्वारे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी अध्ययनासाठी मिड स्वीडन विद्यापीठामध्ये जाऊ शकणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या विद्यापीठाने विशेष बाब म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क (ट्यूशन फी) माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, ही फार महत्त्वाची बाब आहे. या करारामुळे आणखी एक गोष्ट प्रथमच घडून येणार आहे, ती म्हणजे विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिट मिळविता येणार आहेत. पाश्चात्य देशांमधील प्राध्यापक संशोधनाच्या पुढे जाऊन स्वतःचे पेटंट, स्वतःच्या कंपन्या स्थापन करतात. मिड स्वीडन विद्यापीठ त्याला अपवाद नाही. आपल्या संकल्पनेचे उद्यो-व्यवसायांत रुपांतर करून समाजाला आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्याची संस्कृती आपल्या विद्यार्थ्यांत त्यामुळे विकसित होईल. एका वेगळ्या प्रकारची संशोधन संस्कृती आणि ज्ञानसंस्कृती त्यांना अनुभवता येईल आणि अंगिकारताही येईल.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आणि सध्या मिड स्वीडन विद्यापीठात संशोधक, प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. मनिषा फडतरे यांच्या अखंडित प्रयत्नांमुळे सदरचे करार साकार झाले आहेत, याचा मनस्वी अभिमान वाटतो. या दोन्ही विद्यापीठांमधील सहकार्य आणखी कोणकोणत्या क्षेत्रांपर्यंत विस्तारता येईल, याचा या चमूने अभ्यास करावा. संयुक्त अध्ययन, संयुक्त संशोधन प्रकल्प, विद्यार्थी-शिक्षक आदानप्रदान यापलिकडे जाऊन या दोन्ही विद्यापीठांमध्ये निर्माण झालेले सहकार्याचे बंध पुढील काळात शाश्वत कसे राहतील, या दृष्टीने मंथन व्हायला हवे. मिड स्वीडन विद्यापीठात शिकण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे. त्याचप्रमाणे मिड स्वीडनच्या विद्यार्थ्यांनीही शिवाजी विद्यापीठास भेट द्यावी. येथील कला, क्रीडा, संस्कृती अभ्यासावी, तसेच भविष्यात शिक्षणासाठीही येथे यावे, यासाठीही प्रयत्न व्हावेत. शिक्षकांमध्ये अधिक चांगले संबंध निर्माण होण्यासाठी ऑनलाईन संवाद वेळोवेळी घडवून आणावेत, असेही त्यांनी सुचविले.
यावेळी प्रा. मनिषा फडतरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. एस.बी. सादळे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते.