हम्बोल्ड्ट फेलोशिपविषयी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी आणि इंटरनॅशनल अफेयर्स सेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आणि हम्बोल्ट अकॅडमी पुणे चॅप्टर व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या वतीने पीएम-उषा योजनेच्या माध्यमातून जगात अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ‘अलेक्झांडर वॉन हम्बोल्ड्ट पोस्टडॉक्टरल फेलोशिप’विषयी नुकताच (दि. ७) मार्गदर्शनपर परिसंवाद आयोजित करण्यात आला.

 

 

परिसंवाद उद्घाटनाच्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोस्टडॉक्टरल फेलोशिपसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित केले, तसेच विविध क्षेत्रांतील प्रगत संशोधने विकसित भारताच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले.

हम्बोल्ट अकॅडमी पुणे चॅप्टर यांच्या वतीने आयोजित झालेला देशातला हा अकरावा परिसंवाद होता. शिवाजी विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात पदार्थविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, नॅनोसायन्स बरोबरच इंग्रजी या विषयांत, नुकत्याच पीएचडी पदवी प्राप्त झालेल्या तसेच पीएचडीचा प्रबंध जमा केलेल्या एकूण ५० विद्यार्थ्यांनी या परिसंवादाचा लाभ घेतला. यापूर्वीच ही फेलोशिप प्राप्त केलेल्या व हम्बोल्ट अकॅडमी पुणे चॅप्टरचे पदाधिकारी असणारे अनेक राष्ट्रीय संशोधन संस्थांतील निवडक संशोधकांनी यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पहिल्या सत्रात वरीष्ठ संशोधक, प्रा. (डॉ.) मनोहर बडिगर यांनी हम्बोल्ट फेलोशिप बाबतीत संपूर्ण माहिती दिली त्याचबरोबर हम्बोल्ड अकॅडमी पुणे चाप्टर या समूहाबद्दल व त्यांच्या कार्यप्रणाली बद्दल उपस्थित त्यांना अवगत केले. त्यानंतर प्रा. (डॉ.) अशोक गिरी यांनी त्यांच्या संशोधनाचा काही भाग उपस्थितांसमोर सादर केला व कशा पद्धतीचं संशोधन हम्बोल्ट फेलोशिप साठी पूरक असेल यासाठी मार्गदर्शन केले. प्रा. (डॉ.) जयंत खंदारे यांनी ‘लिक्विड बायोप्सी’ या कॅन्सर निदानाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबतीत त्यांनी नवीन निर्माण केलेल्या निदान-पद्धतीबाबत तसेच तिच्या अचूकतेबाबत माहिती दिली. दुसऱ्या सत्रात हम्बोल्ड्ट फेलोशिपची आवेदन पद्धती त्याचे निकष आणि प्रस्तावलेखन यासाठी तज्ञांनी मार्गदर्शन केले.

परिसंवादाच्या आयोजनासाठी स्कूल ऑफ नॅनो सायन्स चे संचालक प्रा. (डॉ.) किरणकुमार शर्मा तसेच इंटरनॅशनल अफेअरसेल चे संचालक डॉ. एस. बी. सादळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी अधिविभागातील शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.