कोल्हापूर – मसाई पठार आणि बांधारी परिसरात गेल्या 2 दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात 2 शेळ्या आणि 1 रेडकू ठार झाली असल्याची घटना घडली आहे. वनविभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा देखील केला आहे. मात्र, बिबट्याचा वावर परिसरात असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेऊर येथील शामराव पाटील यांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून त्यांच्या गोठ्यातील बकरीला ठार केले. त्याचबरोबर, वेखंडवाडी येथील शिवाजी खोत यांच्या गोठ्यातील बिबट्याने रेडकू फस्त केले आणि बादेवाडीतील सदाशिव गवड आणि श्रीपती हिरवे यांच्या मेंढ्यांच्या बग्यावर आज पहाटे बिबट्याने अचानक एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले.
बिबट्याच्या शोधासाठी वनविभागाच्या वतीने जंगल परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, पन्हाळा वनविभागाच्या वतीने स्थानिक नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.