आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने एक दिवशीय कार्यशाळेचे शिवाजी विद्यापीठात आयोजन

कोल्हापूर – ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, शिवाजी विद्यापीठात ५ मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता, विद्यापीठाच्या शाहू सिनेट सभागृहात एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महिलांचे उच्च शिक्षणातील शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी कुलगुरु, प्रा.डॉ.दिगंबर शिर्के असणार आहेत. विद्यापीठातील महिला प्राध्यापक [कायम व हंगामी], प्रशासकिय महिला अधिकारी व प्रशासकिय महिला कर्मचारी (कायम व हंगामी) या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेचे आयोजन, विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाओ अभियान, कै.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, विद्यापीठ अंतर्गत तक्रार समिती, लेडीज हॉस्टेल, विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु-प्रा.[डॉ.] प्रमोद पाटील, कुलसचिव-डॉ. विलास शिंदे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ-डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी सुहासिनी पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अधिविभागाच्या महिला विभाग प्रमुख [अकरा], महिला प्रशासकीय अधिकारी [सहा], महिला अधिष्ठाता आणि प्रातिनिधीक स्वरुपात शहरातील महिला प्राचार्य, आपले ‘शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान आणि आपली जडण-घडण’ या विषयावर मनोगत स्वरुपाची मांडणी करणार आहेत.

हीरक महोत्सवी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात अश्या स्वरुपाचे मुक्त व्यासपीठ पहिल्यादांच, विद्यापीठातील महिला प्राध्यपक आणि प्रशासकीय महिला अधिकारी यांना एकत्र उपलब्ध होत आहे, तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या, बिजिग येथे झालेल्या चौथ्या महिलाविषयक परिषदेच्या, ‘बिजिग जाहीरनामा’ या घटनेला वीस वर्ष पूर्ण होत आहेत,या पार्श्वभूमीवर ‘लिंगभाव समानता’ या तत्वाच्या अनुषंगाने,या कार्यशाळेचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा,असे आवाहन प्रा. [डॉ] .निशा मुडे –पवार [संचालक,स्त्री अभ्यास केंद्र], डॉ. प्रतिभा देसाई [समन्वयक,बेटी बचाओ अभियान],प्रा. [डॉ.] भारती पाटील [समन्वयक,कै.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन], प्रा.[डॉ.] वर्षा जाधव [अध्यक्ष ,अंतर्गत तक्रार समिती], प्रा [डॉ.] माधुरी वाळवेकर [ प्रमुख,लेडीज हॉस्टेल] आणि प्रा.[.डॉ.] पी एम.चौगुले [संचालक,विद्यार्थी विकास विभाग] यांनी केले आहे.

🤙 8080365706