धनश्री रुग्णालयात नव्या वैद्यकीय सोयीसुविधांचा समावेश, रुग्णांसाठी एक मोठे पाऊल!

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यातील मोशी येथील ‘धनश्री रुग्णालया’चे डिजिटल उदघाटन संपन्न झाले. धनश्री रुग्णालयाला शुभेच्छा देताना ते म्हणाले, “इथे आलेला प्रत्येक रुग्ण पूर्णतः बरा व्हावा आणि त्याला पुन्हा रुग्णालयात येण्याची गरज पडू नये, असे यश धनश्री रुग्णालयाला लाभो.” या रुग्णालयात विविध वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या रुग्णांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

 

पुढे ते म्हणाले की, डॉ. राजीव पटवर्धन यांनी रुग्णसेवेचे लावलेले छोटेसे रोपटे आज वटवृक्ष होत आहे. त्यांचा हाच संकल्प डॉ. अपूर्व पटवर्धन आणि डॉ. सलोनी पटवर्धन पुढे नेत असून सामाजिक बांधिलकी जपण्याचे महान कार्य ते रुग्णालयाच्या माध्यमातून करत आहेत. या रुग्णालयात कर्मचार्‍यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. विशेषतः कर्मचार्‍यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यास तिच्या शिक्षणासाठी दर महिन्याला ₹500 थेट बँक खात्यात जमा केले जाते. तसेच अनेक कर्मचार्‍यांच्या मुलांना शिक्षणासाठी आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकारण्यासाठी रुग्णालयाच्यावतीने आर्थिक मदत पुरविली जाते.

‘मूठभर धान्य’ या योजनेच्या माध्यमातून ते अनाथालये, आश्रमशाळा आणि गरजूंना मदत करतात. नुकत्याच पार पडलेल्या स्टार्टअप वीकमध्ये डॉक्टर दांपत्याने सुरू केलेल्या ‘ऑर्थोपेडिक स्टार्टअप’ची महाराष्ट्र सरकारने दाद घेत त्यांचा सत्कारही केला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकार महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात रुग्णालयांचे एम्पॅनेलमेंट करत आहे, ज्याअंतर्गत सुमारे 1300 सेवांचे पॅकेज दिले जाते. लवकरच केंद्र शासनाच्या 1800 सेवांचे पॅकेज महाराष्ट्रातील जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहोत. धनश्री रुग्णालयाने एम्पॅनेलमेंटचा विचार केल्यास या भागातील गरीब रुग्णांना याचा मोठा लाभ होईल. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष आणि धर्मादाय सहायता कक्षाच्या माध्यमातून, जे आजार कोणत्याही पॅकेजमध्ये बसत नाहीत, त्यांना वेगळ्या पद्धतीने मदत केली जाते. ही सेवा धनश्री रुग्णालयाच्या माध्यमातून कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. महेश लांडगे, आ. शरद सोनवणे, आ. शंकर जगताप, आ. अमित गोरखे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.