आजच्या स्पर्धेच्या युगात पत्रकारांनी सजग राहणे गरजेचे आहे

कुंभोज  (विनोद शिंगे)

पत्रकारांसाठीच्या सर्व योजना आणि त्यांचे विविध प्रश्र्न सोडविण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न राहणार असून वस्त्रनगरीच्या विकासासाठी आपणांस हातात हात घालून काम करावे लागणार आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे काम पाहिल्यानंतर या संघटनेची व्याप्ती जाणवली. या संघटनेच्या मी सदैव पाठीशी राहीन, असे आश्वासन आमदार डॉ. राहूल आवाडे यांनी व्हॉईस ऑफ मीडिया इचलकरंजी या पत्रकार संघटनेच्या पत्रकार दिन व पुरस्कार गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिले.

 

व्हॉईस ऑफ मीडिया इचलकरंजी, क्रेडाई, इचलकरंजी व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. व्यासपीठावर उद्योगपती नितीन धूत, चंद्रकांत पाटील, मयूर शहा, फैयाज गैबान आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात कर्म फौंडेशन (सामाजिक), चंदूर संजीवन विद्यामंदीरचे अमित कांबळे (शैक्षणिक), कबड्डीपटू आदित्य पोवार (क्रीडारत्न), श्रीमती शशिकला दासर (समाजरत्न) यांना सन्मानपत्र, ट्रॉफी व रोप देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहाय्यक फौजदार संजीव कराड, पोलीस कॉन्स्टेबल संदीप घाडगे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

संघटनेचे उपाध्यक्ष रविकिरण चौगुले यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे अध्यक्ष साईनाथ जाधव स्वागत केले. पत्रकारांच्या विविध समस्या, गृहनिर्माणचा विषय सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आमच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. सर्व राजकीय पक्ष, संस्था तसेच एखाद्याच्या व्यक्तिगत कार्यक्रमात, सुख-दु:खात पत्रकार धावून जातो. पण पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात काही लोकप्रतिनीधी, सामाजिक संस्था व मान्यवरांनी पाठ फिरवली ही मोठी शोकांतिका आहे. प्रत्येक वेळी सर्वत्र धावून जाणार्‍या पत्रकारांचा विचार होताना दिसत नाही असे म्हणून साईनाथ जाधव यांनी पत्रकारांबाबतची खंत बोलून दाखवली.

आम. राहूल आवाडे पुढे म्हणाले, तुम्ही नाराज होऊ नका, तुमची ताकद मोठी आहे. येणार्‍या काळात व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमासाठी अनेक पाहुणे आम्हाला आमंत्रित करा म्हणून आग्रह धरतील. स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्रकारांसह वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे. पण आज सोशल मीडियावर प्रत्येक पत्रकार सनसनाटी बातमीच्या मागे लागला आहे. सर्वप्रथम माझ्या चॅनेलला बातमी लागावी यासाठी त्याची धडपड असते. एखाद्या व्यक्तीला घडवण्याचे किंवा एखाद्याचे अस्तित्व संपविण्याची मोठी ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते. पत्रकारांनी खरे सत्य समोर आणले पाहिजे. पत्रकारांच्या सर्व योजना व प्रश्र्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. इचलकरंजीच्या जडणघडणीत पत्रकारांचे कार्य मोठे आहे. त्यामुळेच शहराच्या विकासासाठी पत्रकार व आपण हातात हात घालून काम करु या. मी संघटनेच्या पाठीशी आहे. पत्रकाराच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.

क्रेडाईचे अध्यक्ष मयूर शहा यांनी, इचलकरंजीच्या आद्यसंस्थेत व्हॉईस ऑफ मीडियाचा कार्यक्रम होतो आहे, हे कौतुकास्पद आहे. पत्रकारांच्या लेखणीतून अनेक प्रभावशाली कामे झाली आहेत. क्रेडाई व बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेच्या पाठीशी राहील, असे आश्वासन दिले. आमदार अशोकराव माने यांनी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांच्या सर्व समस्यांसाठी विधानसभेत आवाज उठवेन, असे आश्वासन दिले.
प्रा. युवराज मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष रविकिरण चौगुले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रकाश मोरबाळे, राजू बोंद्रे, सतिश मुळीक, सदा मलाबादे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हॉईस ऑफ मीडियाचे इचलकरंजी पदाधिकारी व सदस्य संतोष काटकर, शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब पाटील, निखिल भिसे, रोहन हेरलगे, अजित लटके, कमलाकर जाधव, शाहहुसेन मुल्ला, संतोष मोकाशी, तौसिफ सनदी, सद्दाम मुल्ला यांनी परिश्रम घेतले.