कोल्हापूर : सध्याच्या सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा आहे. तर कृत्रिम बुद्धीमत्ता दूरशिक्षणाचा विस्तार आहे, असे प्रतिपादन जेष्ठ लेखक प्राचार्य डॉ.सुनिलकुमार लवटे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र अंतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा अंतर्गत विशेष ऑनलाईन वाचक लेखक परिसंवाद निमित्ताने "दूरशिक्षणातील दूरवाचन" या विषयावरती ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे होते. यावेळी प्र-संचालक डॉ.के.बी.पाटील व उपकुलसचिव व्ही.बी.शिंदे उपस्थित होते.
प्राचार्य लवटे म्हणाले, दूरशिक्षण पद्धतीतील विद्यार्थ्यांनी अधिकचे वाचन केल्यास त्यांचा शैक्षणिक अवकाश मोठ्या प्रमाणात व्यापलेला असेल.त्याच बरोबर नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. बहुउद्देशीय वाचन करावे.त्यामुळे नवीदृष्टी व नव भान प्राप्त होणार आहे.तसेच भविष्यातील रोजगाराच्या संधी सुध्दा प्राप्त होणार आहेत. दूरशिक्षण माध्यमातून शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनापासून दूर राहून ज्ञान आत्मसात करता येणार नाही.
ज्ञान आत्मसात करताना परिपूर्ण ज्ञानापर्यंत जाता आले पाहिजे. त्यासाठी वाचन हे आपल्या शिक्षणाचा एक अविभाज्य भाग व्हावा.जेणे करून आपले सामाजिक,सांस्कृतिक व आर्थिक जीवन नक्कीच मदत होणार आहे,असे प्राचार्य डॉ.लवटे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शिक्षक वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्राचार्य डॉ.लवटे यांनी दिली.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत डॉ.प्रवीण लोंढे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.संजय चोपडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.नितीन रणदिवे यांनी केले. तर सहा.प्राध्यापक डॉ.प्रकाश बेळीकट्टी यांनी आभार मानले.