कोल्हापूर : कागल तालुक्यातील कौलगे येथील स्वप्नील अशोक पाटील वय 27 याला आज दिनांक 17 रोजी सकाळी डोक्यात दगड घालून ठार मारले गेले. त्यानंतर त्याची ओळख पटू नये व पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून प्रेत जाळण्याचा प्रयत्न केला गेला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगुड पोलीस ठाणे यांची खास तपास पथके तयार केली होती.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तसेच पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अमलदार युवराज पाटील, बालाजी पाटील, रोहित मर्दाने, विजय इंगळे, राजू कांबळे, समीर कांबळे, यशवंत कुंभार यांच्या पथकाने तपास सुरू केला होता.
प्रथम त्यांनी मृतदेह जेथे मिळाला त्या ठिकाणची पाहणी केली त्यावेळी हे मयत स्वप्निल पाटील याचेच प्रेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मोठ्या कौशल्याने माहिती संकलित केली. मयत स्वप्निल व त्याच गावातील अशितोष पाटील व आणखीन एक इसम तिघेजण दिनांक 15 जानेवारी रोजी एकत्र होते. त्यानंतर मयत स्वप्निल घरी आलेला नव्हता ही माहिती मिळाल्यानंतर अशितोष पाटील याचा शोध घेतला गेला. त्याला घरातूनच ताब्यात घेतले गेले त्याच्याकडे सखोल तपासणी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. अशितोष पाटील याच्या चुलत बहिणीची मयत स्वप्नील याने एक वर्षांपूर्वी छेड काढली होती.
त्याचा राग मनात धरून आशितोषने मित्र सागर संभाजी चव्हाण यांच्या मदतीने त्याच्या डोक्यात दगड घालून ठार केले व मयताची ओळख पटू नये म्हणून पेट्रोल ओतून प्रेत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अशी हकीकत अशितोष याने पोलिसांना सांगितली. अशितोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील वय 25 राहणार कौलगे तालुका कागल व सागर संभाजी चव्हाण वय 34 राहणार चिखली तालुका कागल या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सह पदाधिकारी करत आहेत.