कुंभोज ( विनोद शिंगे)
नरंदे येथे शाळेमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रमांचा सराव करत असताना दंगा करणाऱ्या आठवीच्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांना शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना नरंदे हायस्कूलमध्ये घडली.
जखमी विद्यार्थ्यांना हातकणंगले येथील शासकीय रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले आहे. यासंबंधात पोलिस ठाण्यात पालकांनी तक्रार दाखल केली आहे. डॉक्टर आणि शिक्षण विभागाचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिल्याने पालकानी संताप व्यक्त केला.
शुक्रवारी दुपारी शाळेतील आठवीच्या वर्गातील मुले नाचगाण्याचा सराव करत होती. या वेळी मुलांची दंगामस्ती सहन झाली नसल्याने वर्गशिक्षकाने दोन विद्यार्थ्यांना मारहाण केली. मुलांच्या पाठीवर तर दुसऱ्याच्या पायावर काठीचे वळ उठले आहेत. या घटनेची तक्रार मुलाच्या पालकानी हातकणंगले पोलिस ठाण्यात दिली आहे.