सेनापती कापशी:छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत लोकाभिमुख आणि न्यायाधिष्ठित राज्यकारभार केला. त्याच विचारसरणीने आज काम करण्याची गरज आहे. त्यांनी नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न केला. तीच प्रेरणा घेऊन छोट्या- छोट्या कामांमध्ये नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

सेनापती कापशी ता. कागल येथे महसूल विभागाच्यावतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाशिबिरात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, समाजातील शेवटच्या माणसाला लाभ दिल्याशिवाय जाऊ नका. त्याचे समाधान करा. रेशन कार्ड, सातबारा उतारा, वारसा नोंदणी, मोफत धान्य, जमिनीची मोजणी अशा अनेक छोट्या-छोट्या कारणांमुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो. शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना कोणताही अडथळा न येता सहज आणि विनाप्रयास मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, संजय गांधी निराधार, विधवा, परित्यक्त्या, ६५ वर्षांवरील वृद्ध आई-वडील, दिव्यांग, मोफत ऑपरेशन व उपचार, कामगार मंत्री या नात्याने बांधकाम कामगार कल्याणच्या विविध योजना, पी. एम. सूर्यघर, मुख्यमंत्री बळीराजा पानंद व शेत रस्ते योजना, लाडकी बहीण योजना मनापासून व तळमळीने जनता जनार्दनापर्यंत पोहोचविल्या.
*
गेल्या 30-35 वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी मनापासून आणि प्रभावीपणे केली. या योजनांच्या निरंतर अंमलबजावणीतून विधायक कामाचा महापूरच निर्माण झाला. त्यामुळेच जनतेने सलग सहावेळा आमदारपदी निवडून दिले. जनता जनार्दनाच्या आशीर्वादावरच त्यापैकी २२-२३ वर्षे मंत्रीपदी राहण्याची संधी मिळाली. या महापुरात मोठमोठे हत्ती, उंट बुडाले आणि आत्ता शेळ्या उतार मागायला लागल्यात. हे बघून मला तर आश्चर्यच वाटायला लागलंय.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, या देशाच्या संविधानाने जनतेला कायद्याचे राज्य दिलेले आहे. त्यादृष्टीनेच शासनाच्या सर्व योजना आणि निर्णय प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, या हेतूने सरकारने हा महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या अडचणी दूर होवून त्याला कायद्याने अपेक्षित असा न्याय मिळावा, हा या शिबीराचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाने बळीराजा पाणंद रस्ते हा महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतला आहे. यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे अभियान शासकीय अधिका-यांनी तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून न्याय द्यावा, अशी मी अपेक्षा करतो.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पाताई शशिकांत खोत यांचेही भाषण झाले.
व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोत, कागल पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी भोसले, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, पंचायत समिती सदस्य दीपक सोनार, पंचायत समिती सदस्य श्रीमती सुनिता माळी, सौ. सुवर्णा जाधव, सरपंच सौ. उज्वला कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले.
