सात महिन्यांच्या मुलाला सोडून आईचे पलायन !

मोहोळमोहोळ येथील एका कुटुंबातील महिला सात महिन्याच्या लहान मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर महिलेने तिच्या सोबत घरातील सोन्याचे दागदागीने व रोख रक्कमही घेऊन गेली आहे.

 

 

 

 

महिला अचानक बेपत्ता झाल्याने कुटूंबीय चिंतेत पडले असून नातेवाईकांनी मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना चिखली ता मोहोळ येथे घडली.

मोहोळ पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, आकाश तानाजी गुंड हे गेल्या अनेक वर्षां पासून चिखली येथे आई, पत्नी सह वास्तव्यास आहेत. त्यांचे गेल्या दोन वर्षापूर्वी कर्नाटक राज्यातील धर्मपल्ली येथील अक्षदा नावाच्या मुलीशी विवाह झाला आहे. या दांपत्याना सात महिन्याचा लहान मुलगा आहे.

16 जानेवारी रोजी आकाश आणि त्याची आई रोजंदारीवर कामाच्या निमित्ताने बाहेर गावी गेले होते. कामावरून घरी आल्यानंतर त्यांना अक्षदा घरी दिसली नाही. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली, त्यावेळी त्यांना त्यांच्या शेजारील नातेवाईकांच्या घरी मुलाला सोडून जनावरांना पाणी वैरण करून येते असे सांगून गेली असल्याचे समजले.

यावरून त्यांनी थोडावेळ वाट पाहीली मात्र ती घरी परतली नसल्याने घरात ठेवलेले सोने आणि पैसे आहेत का हे पाहीले असता, घरातील सोने व रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या दर्शनास आले. कोणालाही काहीही न सांगता अक्षदा घरातुन निघून गेल्याची खात्री झाली.

दरम्यान सात महिन्याच्या छोट्या बाळाला सोडून निघून गेल्याने या घटनेचे गुढ वाढले आहे. ही घटना घडल्या नंतर दिवस रात्र गुंड कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, अक्षदाचा कोठे ही थांगपत्ता लागत नसल्याने ता 17 रोजी महिला घरातून गायब झाल्याची तक्रार आकाश गुंड यानी मोहोळ पोलीसात दिली.

पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला असून, सदर महिलेची कोणाला माहिती मिळाल्यास अथवा कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मोहोळ पोलीसात दिली.