आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या ५ ते १० वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होईल, मात्र नव तंत्रज्ञान आत्मसात करणार्‍यांसाठी एआय फायदेशीर, अच्युत गोडबोले यांचे उद्गार

कोल्हापूर : आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे येत्या ५ ते १० वर्षामध्ये जगभर सर्वच क्षेत्रात क्रांती होणार आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील नोकर्‍या काही प्रमाणात कमी होतील, हे खरे असले तरी ज्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्याची आवड आहे. बदलत्या तंत्रज्ञानाला आत्मसात करून रोजगाराच्या नवनवीन वाटा शोधण्याचे कौशल्य ज्या व्यक्तींकडे आहे, त्यांना काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

 

कॉम्प्युटर आल्यानंतर सुरवातीला अशीच भिती घातली जात होती. मात्र आज कॉम्प्युटर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्याचप्रमाणे एआयही जीवनातील महत्वपूर्ण भाग व्यापून टाकेल, असे उद्गार ज्येष्ठ वक्ते अच्युत गोडबोले यांनी काढले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने विवेकानंद कॉलेजमध्ये झालेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते.

रोटरी क्लब ऑॅफ कोल्हापूर मिडटाऊनच्यावतीने सौ. अरूंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. विवेकानंद कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ वक्ते अच्युत गोडबोले, रोटरीचे सचिव बी.एस. शिंपुकडे, रमेश खटावकर, निवृत्त जज्ज ए.व्ही.देशपांडे, प्राचार्य आर.आर.कुंभार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. प्राचार्य कुंभार यांनी प्राचार्य गोडबोले यांचा सत्कार केला. यानंतर अच्युत गोडबोले यांनी ए आय तंत्रज्ञान आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम याबाबत विस्तृत विवेचन केले. आपण मशीनला जो डाटा पुरवतो, त्याच डाटयाचा वापर करून, मशीन आपल्याला आवश्यक ती माहिती पुरवते किंवा आपली कामे करते. लहान मुलामध्ये कोणत्याही प्रकारचा डाटा नसतो, मात्र आपल्या भोवती असलेली माणसे जे बोलतात त्याचे अवलोकन करून, ते मुल बोलायला शिकते.

याच सुत्रानुसार ए आय तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला आहे. सध्या जगभरातील डाटा संकलीत करण्याचे काम सुरू आहे. येत्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रामध्ये ए आय तंत्रज्ञानामुळे क्रांती झाली असेल. त्यामुळे जगभरातील बँका, शाळा, कॉलेजीस, रिअल इस्टेट व्यवसाय, पत्रकारिता, रिटेल आणि होलसेल मार्केटींग या क्षेत्रांबरोबरच शेती क्षेत्रामध्ये सुध्दा अमुलाग्र बदल होईल.

शेतकरी ए आय द्वारे आपल्या जमीनीचा कस आणि क्षेत्रफळ पाहून कोणती खते किती प्रमाणात द्यायची, हे ए आय कडून मार्गदर्शन घेईल आणि घरात बसून ड्रोनद्वारे शेती करता येईल. या सर्व क्रांतीमुळे काही प्रमाणात नोकर्‍या कमी होणार असल्या तरी आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी दिर्घकाळ काम केलेले आहे आणि त्यांना नव तंत्रज्ञान शिकण्याची आवड आहे, त्यांना एआय तंत्रज्ञानाचा फायदाच होईल, असे अच्युत गोडबोले म्हणाले. कोणत्याही तंत्रज्ञानाच्या दोन बाजू असतात. त्याप्रमाणे एआय तंत्रज्ञानालाही चांगली आणि वाईट अशा दोन बाजू आहेत. त्या दृष्टीनेही जगभर विचार प्रक्रिया सुरू आहे, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे समाधान गोडबोले यांनी केले. यावेळी प्रा. अशोक पाटील यांच्यासह रोटरी मिडटाऊनचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते.