कागल पंचायत समिती जिल्ह्यात अग्रक्रमावर आणण्यासाठी युतीचे तिन्ही नेते ठामपणे पाठीशी : राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी :“शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून लोकाभिमुख कारभाराच्या जोरावर कागल पंचायत समितीला जिल्ह्यात अग्रक्रमावर आणण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करा.त्यासाठी युतीचे आम्ही तिन्ही नेते ठामपणे तुमच्या पाठीशी राहू”अशी ग्वाही शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

 

 

 

 

कागल पंचायत समितीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकलींचे वाटप करण्यात आले.तसेच पंचायत समितीच्या विविध विभागांमार्फत लाभार्थ्यांना साहित्य व अनुदान योजनांचे धनादेश वितरित करण्यात आले. ग्रामपंचायतींकडील शंभर टक्के कर वसुली करणाऱ्या गावांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.

घाटगे पुढे म्हणाले, “वैद्यकीय, आरोग्य आणि उच्च शिक्षण अशी महत्त्वाची खाती सांभाळणारे मंत्री आपल्या जिल्ह्यात आहेत. त्यांच्या माध्यमातून विकासकामांना गती देऊन कागल तालुक्यासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघ राज्यात अग्रेसर ठेवूया.

सभापती सुवर्णा पाटील म्हणाल्या, “पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना तिन्ही नेत्यांचे भक्कम पाठबळ आहे. त्यातून सर्व विभागांचे कामकाज अधिक गतीमान करू. शाळा व अंगणवाड्यांना भेटी देऊन गैरसोयी दूर करू. घरकुल योजनांतील अडचणी सोडवून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवू.

यावेळी उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी प्रास्ताविकातून पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा सादर केला.

यावेळी पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, दत्तात्रय दंडवते, दीपक सोनार, मनीषा पाटील, शाहूचे संचालक प्रा. सुनील मगदूम, राजेंद्र भोरे, दिगंबर अस्वले,युवराज जाधव,विलास पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी आभार मानले.

कोल्हापुरी चप्पल व गुळाच्या ब्रँडिंगसाठी संयुक्त प्रयत्न करणार

“कोल्हापुरी चप्पल आणि गुळ ही जिल्ह्याची खास ओळख आहे. त्यांच्या ब्रँडिंगसाठी एकत्रित प्रयत्न करूया. राजमाता जिजाऊ व माऊली महिला समिती, पंचायत समिती आणि संबंधित शासकीय विभागांच्या माध्यमातून विक्रीसाठी आउटलेट तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रयत्न केला जाईल.राजे बँक व जिल्हा बँकेमार्फत फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

🤙 8080365706