शिर्डी: शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे महाअधिवेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या अधिवेशनास राज्यातील भाजपा खासदार, आमदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपाचे हे पहिलेच अधिवेशन आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल अमित शहा यांनी महाराष्ट्र भाजपा प्रदेशचे व सर्व पदाधिकारी व नूतन आमदारांचे अभिनंदन केले. भाजपाची विचारधारा व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती यावर महाराष्ट्रातील जनतेने विश्वास ठेवून भाजपासह महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला आहे. राज्यातील हा जनतेचा विश्वास फडणवीस साहेब कामाच्या माध्यमातून नक्कीच सार्थकी लावतील, असे मत अमितभाई यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर या निवडणुकीत राज्यातील जनतेने भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व मान्यवरांनी जनतेचे आभारही मानले.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत झाले पाहिजे. कार्यकर्त्यांच्या बळावरच हा ऐतिहासिक विजय संपादन करता येतो. म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सर्वांनी अहोरात्र मेहनत करून ही विजयी वाटचाल पुढे चालू ठेवण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
याप्रसंगी केंद्रीय मंत्रीनितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ , महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , महाराष्ट्र भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण , चंद्रकांत दादा पाटील, नारायण राणे, पंकजाताई मुंडे यांच्यासह भाजपा खासदार व आमदार तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.