सांगली – तासगाव रस्त्यावरील अपघातात तिघे ठार ;एक जखमी

सांगली : सांगली तासगाव रस्त्यावरील कुमठेफाटा येथे वडाप जीपने दुचाकीला उडविले. या भीषण अपघातात आईसह दोन मुले जागीच ठार झाले. तर पती मात्र गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज (दि.११) सकाळी अकराच्या सुमारास घडला.
दीपाली विश्वास म्हारगुडे (वय 31, रा. तळेवाडी, ता. आटपाडी. सध्या संजयनगर सांगली), त्यांचा मुलगा सार्थक (वय 7) व राजवीर (वय 5) अशी मृतांची नावे आहेत. तर पती विश्वास दादासो म्हारगुडे (वय 33) हा गंभीर जखमी झाला आहे.

 

 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, म्हारगुडे दाम्पत्य मुलांसह सांगलीहून तळेवाडीकडे निघाले होते. ते कुमठेफाटा येथील पेट्रोलपंपासमोर आले असता समोरून भरधाव वेगाने तासगावकडून येणाऱ्या वडापने ओव्हरटेक करीत असताना दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झालेत. अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर पती विश्वास याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, अपघातानंतर वडापचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.