सांगली: लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन बालकांचा शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना (शुक्रवार, दि.6) रोजी दुपारी घडली. श्रद्धा सिद्धनाथ बजबळे (वय 6), व संकेत विलास बजबळे अशी मृत बालकांची नावे आहेत. प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लोणारवाडी येथे या बालकांच्या घराजवळ शेततळे आहे. या ठिकाणी संकेत व श्रद्धा हे दोघेजण खेळत होते. यादरम्यान त्यांचा तोल जाऊन दोघेही तळ्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून, मृत बालकांचे शवविच्छेदन कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू होते. या घटनेची तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.