मुंबई: आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त चव्हाण सेंटर, मुंबई येथे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हसते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी, डॉ. अनिल काकोडकर, सरचिटणीस हेमंत टकले, सुधाकर पवार आणि इतर मान्यवरांसह सहभागी झाले होते. तसेच उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी शरद पवार म्हणाले, अनेक मान्यवरांना पुरस्कार दिले. मला आनंद आहे की, आजच्या चाळीसाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पुरस्काराच्या संबंधीचा निर्णय डॉ. काकोडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केला. त्याच्यामध्ये अतिशय योग्य अशा प्रकारची निवड त्यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांची केली. या पदाची एक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. त्याबद्दल डॉ. काकोडकर आणि त्यांच्या टीमला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो. जयसिंगराव यांच्याबद्दल अधिक काय बोलायची आवश्यकता आहे? इतिहासाचं वास्तव चित्र नव्या पिढी समोर येण्यासाठी त्यांचे अखंड कष्ट आहेत. पुनरलिखाण हा प्रश्न वादाचा असतो. पण खूप वेळेला वास्तवता आणि सत्य याचा इतिहास जर लिहिला गेला तर नवनवीन प्रश्न निर्माण होत असतात. म्हणून वेळ गेला असेल, कालखंड गेला असेल, तरी वास्तव चित्र हे समाजासमोर येईल याची खबरदारी घ्यावीच लागते. आज हा महाराष्ट्राचा इतिहास याचा सखोल अभ्यास करून त्यासंबंधीचे वास्तव चित्र हे समाजासमोर मांडण्याचे काम डॉ. जयसिंगराव गेली अनेक वर्षे सातत्याने करत आहेत, प्रचंड त्यांचं या क्षेत्रात योगदान आहे.
माझी खात्री आहे की या योगदानामुळे नवी पिढी इतिहासाच्या संदर्भात स्पष्टता असलेली अशी पिढी तयार होईल, ज्याची आज आवश्यकता आहे. हा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता सिमित नाही. ज्या ग्रंथाचा उल्लेख त्यांनी केला शाहू महाराजांच्या मीच त्याचं प्रकाशन केलं होतं कोल्हापूरच्या राजवाड्यासमोर मला आठवतंय. तो ग्रंथ वाचल्यानंतर शाहू महाराज यांचे कर्तुत्व, त्यांचे विचार हे देशाच्या हळूहळू कानाकोपऱ्यामध्ये गेले. तुम्हाला कदाचित माहित असेल नसेल. आज शाहू छत्रपती असो, ज्योतिबा फुले असो किंवा डॉ. आंबेडकर असो या सगळ्या संबंधित आज तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलात, बिहारमध्ये गेलात तर गावागावात त्यांचे स्मरण करणाऱ्या संस्था असतील, कुटुंब असतील, भाष्य करणारे लोक असतील. या सगळ्यांचे विचार महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये पोचवण्याचे काम ज्या ज्या महान इतिहासकारांनी केलं त्याच्यामध्ये जयसिंगराव यांचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल.