राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली राज्यातील कारखान्यांच्या गळीत हंगाम पहिल्या उचलीबाबत मार्ग काढण्याची मागणी

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २५ ॲाक्टोंबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेमध्ये गळीत हंगाम सन २३-२४ गळीत हंगामातील २०० रूपये अंतिम हप्ता व गळीत हंगाम २०२४-२५ च्या ३७०० रूपयाच्या प्रतिटन पहिल्या उचलीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असून वरील मागणीबाबत साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांची येत्या १५ दिवसात तातडीने बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांचेकडे केली.

 

 

चालू वर्षीचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अनेक साखर कारखानदार निवडणूक लढविण्यात गुंतल्याने साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नोव्हेंबर अखेर सुरू होण्याची शक्यता आहे.नुकताच येवून गेलेला महापूर व लांबलेला गळीत हंगाम यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे. कडक उन्हाळ्यामुळे ऊसतोडीसाठी मजूराकडून व ऊस तोडणी मशिन मालकाकडून शेतक-यांची पिळवणूक केली जात असून एकरी ५ ते १० हजार रूपयाची मागणी केली जाते.

सोलापूर जिल्ह्यातील १०.८० रिकव्हरी असणा-या कारखान्याने ३५०० रूपये पहिली उचलीचा दर जाहीर केलेला आहे. तर १२ ते १२.३० टक्के रिकव्हरी असणा-या साखर कारखान्यांना तोडणी वाहतूक वजा जाता ३७०० रूपये पहिली उचल जाहीर करण्यास काहीच अडचण नाही. येत्या १५ दिवसात जर काही निर्णय झाला नाही तर शासन व साखर कारखानदार यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागणार असून या आंदोलनाने झालेल्या नुकसानीस संघटना जबाबदार असणार नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.