कोल्हापूर : जिल्ह्यात १० जागांवर महायुतीने बाजी मारली असून महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे. महायुतीला राज्यात यश मिळालं आहे. त्यावरून स्पष्ट झालं आहे कि, महायुतीच्या या यशात कोल्हापूर जिल्ह्याचा १०० टक्के वाटा राहिला आहे. कोल्हापुरातील हे विजयी उमेदवार मुंबई मध्ये रवाना झाले आहेत.
कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक विजयी झाले आहेत. इचलकरंजीमधून राहुल आवाडे जिंकले आहेत. शिवसेना शिंदे गटाने सुद्धा जिल्ह्यातील तिन्ही जागा पटकावल्या आहेत. राधानगरीमधून प्रकाश आबिटकर, करवीरमधून चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कागलची जागा राखण्यामध्ये यश मिळालं आहे. या ठिकाणी हसन मुश्रीफ यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला आहे. दरम्यान जनसुराज शक्ती पक्षानेही दमदार कामगिरी करताना दोन जागा पटकावल्या आहेत. शाहूवाडीमधून विनय कोरे यांनी विजय मिळवला असून हातकणंगले मतदारसंघातून अशोकराव माने विजयी झाले आहेत. शिरोळमध्ये सुद्धा शिवसेना पुरस्कृत शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या वाट्याला जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा गेल्या आहेत.