कोल्हापूर: कोल्हापूरचे रस्ते, अस्वच्छता, शौचालयांची दुर्दशा पाहून जनता संतप्त आहे. विकासाचा डांगोरा पिटणाऱ्यांनी केवळ स्वतःचा आणि कुटुंबीयांचा विकास केला. कोल्हापूरची ही दुर्दशा, अस्वस्थ वातावरण व दादागिरी थांबवण्यासाठी सर्वसामान्य परिवारातील कार्यकर्ता राजेश लाटकर यांना जनतेने विजयी करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ मुक्तसैनिक वसाहत येथे ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रमात ते बोलत होते.
सत्तेत असलेल्या खोकेबहाद्दर सरकारने महिलांना पंधराशे रुपये दिले आणि जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून पंचवीसशे परत घेतले. इतकेच नव्हे तर पंधराशे रुपये दिलेल्या महिलांना धमकी दिली जात आहे. या महिला तुमच्या गुलाम आहेत का? कोल्हापुरातील माता भगिनींचा हा अपमान स्वाभिमानी जनता सहन करणार नाही. राजेश लाटकर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झालेला कार्यकर्ता आहे. त्यांनी महापालिकेत विविध पदावर काम केल्यामुळे शहराच्या बारीकसारीक गोष्टींची त्यांना माहिती आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या आशीर्वादाने या सर्व समस्या सोडवण्यासाठी ते मतदारांकडे कौल मागत आहेत. त्यामुळे त्यांना आपले बहुमत असे मत देऊया कोल्हापुरात विकासाचे नवे पर्व सुरू करूया असे ते म्हणाले.
राजेश लाटकर म्हणाले, संविधानाने देश एकसंध बांधला. प्रत्येकाला मताचा अधिकार दिला. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाबाबत जागरूक असावे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही विरोधकांनी भ्रष्टाचार केला, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून युवकांचा रोजगार हिरावून घेतला, राजकीय फायद्यासाठी जाती-धर्मात भांडण लावली जात आहेत. जनतेने मला एकदा संधी द्यावी, मी कोल्हापूरचा शाश्वत विकास करण्याचे आश्वासन देतो. पुढील तीन महिन्यांत ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढतो. रस्ते, कचऱ्याच्या प्रश्नी समन्वय काढून समस्यांचे निराकरण करतो.
यावेळी राजू डकरे, प्रदीप पाटील, संतोष रेडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले व राजेश लाटकर यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला. चर्चेसाठी राजेश माने, सुरेश करंजेकर, मीरा सावंत, अरुण वाडकर, भालचंद्र जाधव, जयसिंग साळोखे, सुधाकर वाणी, गजानन माने, संतोष रेडेकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.