बंद पडलेला गडहिंग्लज साखर कारखाना सुरू करून मंत्री हसन मुश्रीफ यांनीच शेतकऱ्यांना व कामगारांना आधार दिला:सतीश पाटील- गिजवणेकर

गिजवणे :बंद पडलेला गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच सुरू करून शेतकऱ्यांसह कामगारांनाही आधार दिला होता. परंतु; त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळूनच ब्रिस्क कंपनी हा कारखाना सोडून गेली, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर यांनी केला. आत्ता निवडणुकीनंतर डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या मनमानी आणि भ्रष्टाचारी कारभारामुळेच पुन्हा शेतकरी आणि कामगारही अडचणीत आले आहेत, असेही ते म्हणाले.

 

 

 

 

गिजवणे ता. गडहिंग्लज येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

भाषणात पाटील पुढे म्हणाले, सौ. स्वाती कोरी पालकमंत्री  मुश्रीफ यांच्यावर धादांत खोटे आरोप करीत आहेत. २०१३ मध्ये कै. ॲड. शिंदे यांची सत्ता होती. कर्मचाऱ्यांचा ११ महिन्यांचा पगार थकला होता, त्यांच्यावर शेतमजूरीला जाण्याची वेळ आली होती. या परिस्थितीत आम्हा सर्वांचा आग्रह आणि पाठपुराव्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी ब्रिक्स कंपनीला कारखाना चालवण्यास घ्यायला लावला. आठ वर्षे कारभार सुरळीत असताना नंतर या मंडळींच्या त्रासामुळेच कंपनी कारखाना सोडून गेली. तसेच; वर्षापूर्वी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीनंतर डॉ. प्रकाश शहापूरकर यांना अध्यक्ष केले. त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत भ्रष्टाचाराचे महापाप केले. त्याचीही चौकशी सुरू आहे, यातून सर्व सत्य बाहेर येईल.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून पासून कडगाव- गिजवणे जिल्हा परिषद मतदार संघ कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला. या परिसरातील गाव-खेड्यांचा सखोल अभ्यास करून सुरुवातीच्या काळात मूलभूत सोयी -सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले. नंतरच्या काळात मिळालेल्या विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्वच गावांमध्ये कोट्यावधींचा निधी दिला. मूळच्या कागल मतदारसंघापेक्षा अधिक प्रमाणात निधीची उपलब्धता केल्यामुळे प्रचंड विकास कामांच्या माध्यमातून गावेच्या गावे सर्वांगसुंदर बनली. येथील लोकांनी मला नेहमीच पाठबळ दिल्यामुळे आपल्या सर्वांच्या ऋणात राहीन, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे म्हणाल्या, सौ. स्वाती कोरी गेल्या विधानसभा निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक करत होत्या. आज विरोधी उमेदवारांच्या व्यासपीठावर बेताल आरोप करीत आहेत. एक महिला इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकते, याबद्दल त्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे.

बहुरूप्याची भूमिका…..!
सिध्दार्थ बन्ने सौ. स्वाती कोरी यांच्यावर टीका करताना म्हणाले म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेत स्वतःची उमेदवारी जाहीर करायची आणि खोक्यासाठी तडजोड करायची, हे काम त्यांनी आयुष्यभर केलं आहे. अशी बहुरूप्याची भूमिका घेणाऱ्यांचा मंत्री मुश्रीफ यांना चांगलाच अनुभव आला असून आता सतेज उर्फ बंटी पाटलांनाही तो अनुभव येईल.

गोडसाखर उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कोलेकर, मराठा संघटनेचे देसाई, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, विजय काळे यांचीही मनोगते झाली.

व्यासपीठावर गडहिंग्लज कारखाना अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, किरण कदम, सुषमा पाटील, सौ. शैलजा पाटील, सरपंच पौर्णिमा कांबळे, एस. आर. पाटील, के. बी. पोवार, पी. एस. देसाई, मिलिंद मगदूम, अनुप पाटील, पृथ्वीराज पाटील, सुदेश चौगले, नितीन पाटील, अमित देसाई, भूषण गायकवाड, संतोष चव्हाण, अजय बुगडे आदी प्रमूख मान्यवरांसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वागत उपसरपंच आदित्य पाटील यांनी केले. आभार रमेश पाटील यांनी मानले.