माद्याळ: ग्रामविकास मंत्रीपदाच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलू शकलो. प्रचंड विकास कामे करता आल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.माद्याळ ता. कागल येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुतराव चोथे, पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, २८ हजार कोटी रुपयांचे वार्षिक बजेट असलेले ग्रामविकास खाते आपल्याकडे आल्यामुळे प्रचंड मोठे विकासकाम करता आले. गावागावातील रस्ते, मुख्य रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, अंगणवाडी इमारत, शाळा, ग्रामसचिवालये आदी कामे झाली. दरम्यानच्या काळात कोरोनासारखं महाभयंकर संकटही राज्यावर आले. मात्र; या काळातसुद्धा आपण क्षणभर न थांबता सतत काम करत राहिलो. म्हणूनच गेल्या पाच वर्षात सात हजार कोटी रुपयांचा निधी या मतदार संघात आणता आला. इतकी प्रचंड विकासकामे केली असताना विरोधक मात्र काम न करता आज मत मागायला तुमच्यासमोर येत आहेत. त्यांना तुम्ही सर्वांनी जाब विचारला पाहिजे.
गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगे म्हणाले, विरोधक जातीचा आधार घेत विषारी प्रचार करीत आहेत. त्यांच्यात जर धमक असेल तर त्यांनी सर्वसामान्य जनतेत मिसळून कामे करून निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान त्यांनी दिले.
कागल तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सूर्याजी घोरपडे म्हणाले, एका अल्पसंख्यांक घराण्यात जन्माला येऊनसुद्धा पुरोगामीत्वाचा वारसा असलेल्या कागल मतदार संघातून आमचे नेते हसनसाहेब मुश्रीफ पाचवेळा विजयी झाले आहेत. १९ वर्षे राज्याच्या मंत्री मंडळात ते मंत्री आहेत. यावेळीसुद्धा ते विजयाचा षटकार ठोकणार आहेतच. माद्याळसारख्या १४ वाड्या वस्त्यांवर वसलेल्या गावांमध्ये २० कोटीहून अधिक निधी देऊन सर्व कामे पूर्णत्वाकडे नेली आहेत. हे खरेखुरे शाहू महाराजांचे वारसदार आहेत.
आभाळाएवढा माणूस…….!
सौ. उज्वला सोनूसिंह घाटगे म्हणाल्या, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ हे आभाळाएवढा माणूस आहेत. गोरगरीब, ऊपेक्षित, वंचित माणसं हाच त्यांचा परिवार आहे. त्यांनी गोरगरिबांना सतत छातीशी घट्ट धरले आहे. रंजल्या- गांजलेल्याना त्यानी आपलं मानलं आहे.
यावेळी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, शशिकांत खोत, विजय काळे, दिलीप शिंदे, दीपक सोनार, अंकुश पाटील, सोनूसिंग घाटगे आदी उपस्थित होते.