आदमापूर : राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातून सकाळपासूनच आदमापुरकडे लोक जथ्याने येत होते. मोजता येणार नाहीत एवढ्या गाड्या आणि माणसांची तर नुसती रेलचेल सुरू होती. हे चित्र होते राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यांच्या सीमा जेथे जुळतात त्या मुदाळ तिठ्ठा परिसराचे. तेथून पुढे आदमापुर कडे जाण्यासाठी लोकांना मोठी कसरत करावी लागत होती. सभास्थळीही याच्यापेक्षा काही वेगळे चित्र नव्हते. यासाठी निमित्त ठरली ती आमदार के पी पाटील यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आदमापुर येथे झालेली जाहीर सभा .
यानिमित्ताने गारगोटी ते आदमापूर या मार्गावर निघालेल्या मोटरसायकलच्या महा रॅलीने तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातील आजपर्यंतचा विक्रमच मोडला. महारॅलीत सामील झालेल्या अनेकांना सभास्थळापर्यंत पोहोचताच आले नाही. इतकी विराट गर्दी आज के पी पाटील यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने या परिसराने प्रथमच अनुभवली. या महारॅली आणि महासभेने सर्वसामान्य जनतेचा कौल नेमका कुणाकडे आहे याचे चित्र स्पष्ट झाल्यासारखे आजची स्थिती होती. आज दुपारी आदमापुरात सभा झाली; परंतु सकाळपासूनच सभास्थळी गर्दीने उच्चांक गाठला होता. सभास्थळ, परिसर आणि रस्त्यावर जिकडे नजर जाईल तिकडे शिवसेनेचे भगवे आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तिरंगी झेंड्यांसह महाविकास आघाडीतील अन्य राजकीय पक्षांचे झेंडे दिसत होते. याच रंगांचे स्कार्फ आणि शिवसेनेच्या भगव्या टोप्यानीही वातावरण निर्मितीत भर घातली होती. आमदार प्रकाश आबिटकरांनी उमेदवारी अर्ज भरताना केलेल्या शक्तिप्रदर्शनाला के पी पाटील समर्थकांनी आजची महासभा व महारॅली हे दिलेले जणू उत्तर होते. सभेत वाजणाऱ्या शिवसेना व महाविकास आघाडीच्या प्रचारगीतांनीही या वातावरणात अजून भर घातली. सभेत उमेदवार के.पी.पाटील यांच्यासह अन्य वक्त्यांनी विरोधी उमेदवार आबिटकरांवर टीकेची झोड उठवली. आमदार सतेज पाटील यांनीही कमी वेळेत मुद्देसूद मांडणी केली. आणि उद्धव ठाकरेंनी तर आपल्या भाषणात उमेदवार के पी यांच्या विजयासाठी पोषक अशी वातावरण निर्मिती केलीच. यावेळी त्यांनी आबिटकरांपासून ते अगदी एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि थेट मोदी – शहांवर जोरदार प्रहार करीत सभेचे वातावरण महाविकास आघाडीसाठी अजून उच्च पातळीवर नेवून ठेवले. एकूणच आजची महा रॅली व महासभा ही के पी पाटील यांची जणू विजयी सभा ठरली.
सतेज,आता होवून जावू द्या …आमचं ठरलंय !
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्या राजकीय रणनीतीचा उल्लेख करीत के पी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवीत असल्याचे सांगून तुमची नेहमीची प्रसिद्ध टॅगलाईन ‘आमचं ठरलंय’ ही आता पुन्हा काढा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय अजून सोपा करा असे म्हणताच सभागृहात प्रचंड मोठा टाळ्यांचा कडकडाट झाला.