कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेस पक्षात रोज नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आज आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत मोठा धक्का दिला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र त्यांच्या नावाला काँग्रेस मधूनच विरोध झाल्याने त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की काँग्रेसवर आली होती.

त्यानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लाटकर नाराज होते आज सकाळपासून ते नॉटरिचेबल होते दरम्यान आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दहा मिनिटात खासदार शाहू महाराज, युवराज मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही,ते चांगले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा परिस्थितीत निवडणूक लढायचं नाही, असे खासदार शाहू महाराज यांनी सांगितले.
