कोल्हापूर : शहरामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जास्तीजास्त नागरिकांमध्ये विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करा. घरोघरी नागरकांशी संपर्क साधून सहभाग वाढवा अशा सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी स्वीप सब नोडल अधिका-यांना दिल्या. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर स्वीप उपक्रमाअंतर्गत विधानसभा मतदार संघनिहाय स्वीप नोडल अधिकारी यांची आढावा बैठक आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उप-आयुक्त साधना पाटील, मतदार संघ 274 कोल्हापूर दक्षिण नोडल ऑफिसर संजय सरनाईक, मतदार संघ 276 कोल्हापूर उत्तर नोडल ऑफिसर नेहा अकोडे, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सब नोडल ऑफिसर वर्षा परीट, उपशहर अभियंता सुरेश पाटील, आर के पाटील, महादेव फुलारी, रमेश कांबळे आदि उपस्थित होते.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना महापालिकेच्या सर्व कार्यालयामध्ये येणा-या नागरीकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करा. प्रत्येक अर्ज, दाखले, फॉर्मवर मतदान जनजागृतीबाबत शिक्के मारुन दया. आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांमार्फत व बीएलओ मार्फत घरोघरी नागरीकांकडून मी मतदान करणार याबाबत जनजागृती करुन स्व-इच्छेने घोषणापत्र भरुन घ्या. महापालिकेच्या सर्व कर्मचा-यांपासून याची सुरुवात करा. याचबरोबर हॉस्पीटलमध्ये येणारे नागरीक, सीएफसी सेंटर येथील नागरीकांचा सहभाग घ्यावा. तसेच स्वीप अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात यावेत अशा सूचना केल्या.