गारगोटी : मुंबईतील मातोश्री हे देशभरातील तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान आहे. या मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे महापाप करणाऱ्या गद्दार आणि विश्वासघातकी आमदारांना आता घरचा रस्ता दाखवूया असा हल्लाबोल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर केला.
गारगोटी येथे भुदरगड तालुका शिवसैनिकांच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “मातोश्रीमध्ये होणारे निर्णय हे अंतिम असतात. निर्णय झाल्यानंतर परिणामांची फिकीर न करता शिवसैनिक निर्णयाप्रमाणे कामाला लागतो. हेच काम भुदरगड तालुक्यातील शिवसैनिक माजी आमदार के पी पाटील यांच्या विजयासाठी करतील. शिवसैनिक म्हणजे जीवाचे रान करणारा कार्यकर्ता अशी आमची ओळख असते. के पी पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढत असल्याने त्यांना ते याआधी आमदार असताना जेवढ्या मताधिक्याने विजयी झाले त्याहून अधिक मताधिक्याने यावेळी विजयी करू.”
शिवसेना उपनेते विजय देवणे म्हणाले,” विद्यमान आमदार विविध शासकीय इमारतींबरोबरच धरणे बांधल्याचे फोटो छापतात. मग मेघोलीचे धरण कुणामुळे फुटले ? कित्येक कोटी खर्चून नव्याने बांधलेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पांना कुणामुळे गळती लागली? कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची लाट आली असून या लाटेमध्ये मेघोलीचे धरण ज्यांच्यामुळे फुटले ते कधी वाहून गेले हे कळणार पण नाही.”
अविनाश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार के पी पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, रियाज भाई, कृष्णात डाकरे आदींची भाषणे झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेल्या आरळगुंडी येथील मारुती चौगले, ऋषिकेश चौगले, सुरज चौगले, तानाजी चौगले, बळवंत चौगले, किरण चौगले आदींचा सत्कार करण्यात आला. बचाराम गुरव यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी सचिन असबे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बिद्री जिंकली …..
आता विधानसभा जिंकायचीच !
विजय देवणे यांनी भाषणादरम्यान बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबतही भाष्य केले. ते म्हणाले,” के पी पाटील यांच्या अनुभवाचा बिद्री साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकाला मोठा फायदा झाला आहे. त्यांच्या चोख कारभारामुळे नुकतीच बिद्रीची निवडणूक जिंकली असून ज्यांनी बिद्रीच्या कामकाजात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्या विद्यमान आमदारांना पराभूत करून यावेळी विधानसभाही जिंकायचीच आहे.”