कागल: कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. आजवरचे आयुष्य जनतेची इमाने-इतबारे सेवा करण्यातच खर्ची घातले. उर्वरित आयुष्यातही जनतेचे हे पांग फेडण्याची शक्ती मला गोमातेने द्यावी, अशी प्रार्थना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.कागल येथील श्री गहिनीनाथ गैबी चौकात वसुबारसच्या निमित्ताने गोमातेची पूजा मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाली.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गेली ४० वर्ष अव्याहतपणे सामाजिक जीवनात कार्यरत आहे. या काळात सहा वेळा विधानसभा निवडणूक लढविली. त्यापैकी; जनतेने मला सलग पाचवेळा निवडून दिले. त्यामुळेच मला पंचवीस वर्षे आमदार व त्यापैकी १९ वर्ष मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. जनतेची हे ऋण या जन्मीच काय, तर सात जन्मातही फेडू शकत नाही.जनतेचा हा पांग फेडण्याच्या कृतज्ञतेच्या भावनेतूनच रुग्णसेवा, निराधारांची सेवा, विकासकामे, बांधकाम कामगारांचे कल्याण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माता -भगिनींना दिलासा,आरोग्यसेवेच्या माध्यमातून मी माझे आयुष्य खर्ची घातले आहे.
यावेळी पत्रकार अतुल जोशी, भैय्या माने, समीर घाटगे, नितीन दिंडे, आदी प्रमुख उपस्थित होते.
नवे विकास पर्व आणणार
श्री. मुश्रीफ म्हणाले, आजपर्यंतच्या वाटचालीत विकास कामांसह विशेषता निराधारांची सेवा, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून केलेली आरोग्यसेवा, बांधकाम कामगारांसह कामगारांचे कल्याण, जनतेच्या अडीअडचणी व समस्यांचा निपटारा या गोष्टीमध्ये अत्यंत तळमळीने काम केले. या पुढील काळातही मतदारसंघात नवे विकासपर्व आणणार, असेही ते म्हणाले.