कोल्हापूर: शांत आणि समृद्ध शहर अशी कोल्हापूरची ओळख आहे. पण गांजा, चरस बरोबर आता कोकेन सारखे ड्रग्स खुलेआम पुरविणारे रॅकेट तयार झाल्याची कोल्हापुरात चर्चा आहे. काही दिवसापूर्वी कोकेन विकायला आलेल्या लोकांना पोलिसांनी पकडले आहे, हे याचे ढळढळीत उदाहरण आहे. अशा अंमली पदार्थांची उपलब्धता करून देऊन कोल्हापूरला टार्गेट केले जात आहे का ? असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी मांडला आहे. तसेच युवा पिढीला बरबाद करत नशेच्या अधीन ठेऊन गुन्हेगारी वाढविण्याचा हा डाव आहे का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी या सर्व प्रकारांच्या मुळाशी जाऊन असले प्रकार बंद करण्यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे आणि याबाबत ठोस पावले उचलावीत.अन्यथा कोल्हापूरच्या सुज्ञ जनतेसोबत आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.असा इशारा सतेज पाटील यांनी दिला आहे.