महाविकास आघाडीकडून ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप केले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप शिंदे फडणवीस सरकारने केले आहे. महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

 

वांद्रे पश्चिम येथील हॅाटेल ताज लॅंडस एन्डमध्ये महाविकास आघाडीने राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारच्या काळ्या कारभाराचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, खा. संजय राऊत, खा.अरविंद सावंत, खा.सुप्रिया सुळे, खा.अनिल देसाई, आ.आदित्य ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, माजी मंत्री आमदार बाबा सिददीकी यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला. शाळेतील मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. राज्यातली जनता सुरक्षित नाही आता तर सत्तेतील लोकही सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आता महायुतीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जाणार नाहीत तर जनताच यांना सत्तेतून खाली खेचेल. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना असंवैधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे, काँग्रेसने त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून लोकशाहीचा खुन करण्याचे काम करत आहे, रश्मी शुक्ला हे त्याचेच एक उदाहरण आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीक विम्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. अतिवृष्टीनंतर केंद्राचे पथक आंध्र प्रदेशात गेले पण महाराष्ट्रात आले नाही. महाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरुण मुले शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण ह्या सरकारने सर्व उद्योग व रोजगार गुजरातला पळवले आहेत, आता हे सरकार घालवले पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, महायुती सरकारने मंत्रिमंडळात धडाधड निर्णय घेतले पण त्यातील किती निर्णयांची अंमलबजावणी होईल. महाराष्ट्राच्या प्रशासनाचा देशात लौकिक होता पण महायुती सरकराच्या काळात ही प्रशासकीय व्यवस्था उद्ध्वस्थ झाली आहे, त्याची महाराष्ट्राला मोठी किंमत मोजावी लागत आहे. प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्यांच्या हातून महाराष्ट्र वाचवावे लागेल आणि त्यासाठी मविआ प्रयत्न करत आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबा सिद्दीकींची हत्या होईपर्यंत यंत्रणा काय करत होत्या? फडणवीसांचे सरकार असताना नाना पटोले यांचा फोन टॅप केला जात होता, विरोधकांवर बारीक लक्ष पण गुन्हेगारांवर लक्ष का नाही? ईडी, सीबीआय फक्त विरोधकांसाठीच आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत जर हत्या होत असेल, महिलांवर अत्याचार होत असतील तर राज्यात कायदा आहे कुठे? अभिषेक घोसाळकर या तरुणाची हत्या झाली त्यावेळी, “गाडीखाली कुत्रे आले तरी विरोधक गृहमंत्र्याचा राजीनामा मागितील”, असे फडणवीस म्हणाले होते, हे जनतेला कुत्रे म्हणतात. महायुतीने महाराष्ट्राला गुजरातची वसाहत बनवले आहे परंतु मविआ मात्र शिव, शाहु, फुले, आंबेडकरांचे राज्य मोदीशाह यांचे होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत या सरकारला हरवले पाहिजे.

काँग्रेसने बंजारा समाजाला काहीच दिले नाही या आरोपाचा समाचार घेत शरद पवार म्हणाले की, काँग्रेसने बंजारा समाजाला राज्याचे नेतृत्व करण्याची दोनदा संधी दिली. वसंतराव नाईक यांना ११ वर्षे मुख्यमंत्रीपद दिले तर सुधाकर नाईक यांनाही मुख्यमंत्री केले. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे असेही पवार म्हणाले.

हरियाणाच्या निकालावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता राज्यात बदल करण्यासाठी उत्सुक आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही तसेच चित्र होते. मविआने ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या आणि विधानसभेलाही तसेच परिणाम येतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर उत्तर देताना मविआच्या नेत्यांनी, मविआत नेतृत्वाच्या प्रश्न नाही व खुर्चीसाठी वादही नाहीत, आमच्यात एकमत आहे. ही निवडणूक मविआ विरुदध महायुती अशी आहे. महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर पाहू, असे स्पष्ट केले.