डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात

नवे पारगाव/वार्ताहर
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तलसंदेचा पहिला दीक्षांत समारंभ सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाला. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते अग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांचा डी. लिट तर जैन इरिगेशनचे अनिल जैन यांना डी. एससी पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी 661 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.

 

तळसंदे एज्युकेशनल सिटीमधील शांताई सभागृहात भव्य शोभायात्रेने दिक्षांत समारंभाला प्रारंभ झाला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला उद्योगमंत्री उदय सामंत, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, एग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ के. प्रथपन, कुलसचिव डॉ. जे . ए. खोत, परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य, एकेडमिक कौन्सिल मेंबर्स व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी 661 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवीने सन्मानित करण्यात आले. 18 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले.

यावेळी डी.एससी. पदवीने सन्मानित केलेले अनिल जैन म्हणाले, कृषी आणि तंत्रज्ञान या दोन्हींवर फोकस करून या विद्यापीठाचा सुरू असलेला प्रवास अभिमानास्पद आहे. कृषी क्षेत्राची गरज व व्याप्ती सतत वाढतच जाणार असून या माध्यमातून भारताच्या विकासामध्ये सहभागी होण्याची संधी तरुणाईला मिळणार आहे. कोणत्याही कार्यात यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांजवळ शिस्त आणि ध्येय आवश्यक आहे. डेडीकेशन व कमिटमेंट आणि त्याला हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कची जोड दिल्यास कोणतेही यश अशक्य नाही. मात्र त्यासाठी कोणताही शॉर्टकट नको आपली मूल्य आणि तत्व पाळूनच ध्येयाकडे वाटचाल करावी.

डि.लीट. पदवीने सन्मानित एग्रोवन संपादक आदिनाथ चव्हाण यांनी आपल्याला मिळालेली डि.लीट. ही पदवी ही शेती, माती व शेतकऱ्यांसाठी समर्पित करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले देशातील पहिल्या कृषी विद्यापीठा कडून देशातील पहिल्या कृषी विषयाला वाहिलेल्या दैनिकाच्या संपादकाला मिळालेली डिलीट ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. भवरलाल जैन की डी वाय पाटील साहेब या दोघांनीही नेहमीच सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन प्रचंड कष्ट घेत मोठे यश मिळवले. विद्यार्थ्यांनीही नेहमी सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करावे. कष्टाची तयारी व कामावर निष्ठा असेल तर यश निश्चितच मिळेल.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपला आदर्श म्हणून इतर कोणाकडे पाहण्यापेक्षा कुलपती डॉ. संजय डी पाटील यांचा आदर्श घ्यावा. शेतीसाठी जमीन विकत घेणारी व्यक्ती त्याच जमिनीवर कृषी विद्यापीठ उभारतो हाच मोठा आदर्श आहे. हे विद्यापीठ लवकरच देशातील एक नंबरचे कृषी आणि तंत्र विद्यापीठ बनेल याची खात्री आहे. जमिनीवर पाय ठेवून चालणाऱ्या आणि आपल्या वागण्या बोलण्यातून नम्रपणाचा प्रत्यय देणारे पाटील कुटुंबीय सर्वांनीच आदर्श घ्यावा असे आहेत. ज्या संस्थेने आपल्याला मोठे केले त्या संस्थेला कधी विसरू नका. नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात गेला तरी आपल्या मातीची आपल्या राज्याची सेवा करण्यासाठी पुढे या.आई-वडील आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कार्यातूनच देशभक्त बना असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तळसंदे येथील ओसाड माळरान ते गोल्डन लँड हा प्रवास मांडला. या ठिकाणी कृषी शिक्षण देणारे विद्यापीठ उभारण्याचा विचार, ते सुरू करण्यासाठी घेतलेली मेहनत व प्रत्यक्ष विद्यापीठाची स्थापना यांचा प्रवास त्यांनी सांगितला. या सर्व प्रक्रियेत तत्कालीन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. या विद्यापीठाचा जागतिक पातळीवर नावलौकिक होण्यासाठी सर्व सहकारी नक्कीच मेहनत घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. पाटील यांनी यावेळी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यापीठात घेतलेल्या ज्ञानाचा सर्वसामान्यसाठी उपयोग होईल असा सतत प्रयत्न करा असे आवाहन त्यानी केले.

कुलगरू डॉ. के. प्रथापन यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकाना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती दिली.

यावेळी सौ पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन. जाधव, डी. वय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कृषी व तंत्र विद्यापीठाचे वित्त अधिकारी सुजित सरनाईक, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली भूपती, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, सीएचआरओ श्रीलेखा साटम, चव्हाण व जैन कुटुंबीय यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थामधील प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

18 जणांना सुवर्ण पदक
2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या 7 आणि 2024 मधील 11 विद्यार्थ्यांना यावेळी गोल्ड मेडल ने गौरविण्यात आले.