९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते शेंडा पार्क येथील ११०० खाटांच्या रूग्णालय इमारतीचे भूमिपूजन

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथील ११०० खाटांच्या विविध रूग्णालयांच्या इमारतीच्या भूमिपूजनासह विविध पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दि.९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. याच ठिकाणी जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे. त्या अगोदर ४.०० वा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे कार्यक्रमाच्या तयारीबाबतचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बांधकाम विभागाचा आढावा त्यांनी घेतला. भूमिपूजनामध्ये २५० खाटांचे कर्करोग रूग्णालय, ६०० खाटांचे सामान्य रूग्णालय व २५० खाटांचे अतिविशेषोपचार रूग्णालयांचा प्रामुख्याने समावेश आहे तर विविध पुर्ण कामांचे लोकार्पण होणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या नियोजन बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी तयारीमध्ये काय काय करायचे याबाबत आढावा घेतला. या बैठकीला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस.मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, महापालिकेचे अधिकारी व इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय (शेंडापार्क) कोल्हापूर येथील विविध कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यात २५० खाटांच्या कॅन्सर हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम, २५० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इमारतीचे बांधकाम व ६०० खाटांच्या सामान्य रूग्णालय इमारतीचे बांधकाम असे मिळून ५६७.८५ कोटी रूपयांच्या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. याचबरोबर न्यायवैद्यकशास्त्र विभाग इमारतीचे बांधकाम करणे ८.६७ कोटी, जमीन सपाटीकरण व सुशोभिकरण करणे (बागकाम व पेव्हींग ब्लॉक) बांधकाम करणे १४.६० कोटी रूपये, बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट व बास्केटबॉल कोर्ट बांधकाम करणे ४.५६ कोटी, संस्थेतील ५ विविध इमारतींच्या बांधकाम करणे यात १५० क्षमतेचे डॉक्टर मुलांचे व १५० क्षमतेचे डॉक्टर मुलींचे वसतिगृह, १२५ निवासी डॉक्टर पुरूष व १२५ निवासी डॉक्टर मुलींचे वसतिगृह, १५० क्षमतेचे नर्सींग वसतिगृह व प्रशिक्षण केंद्र यांसाठी मिळून १३६ कोटी रूपये, इ. कामांचे भूमिपूजन त्या दिवशी होणार आहे.

तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय (शेंडापार्क) कोल्हापूर येथील पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण होत आहे. यात श्रोतगृह इमारत ५.८५ कोटी रूपये, व्याख्यान कक्ष व परिक्षा कक्ष इमारत ९.५५ कोटी, १५० क्षमतेचे मुलींचे वसतीगृह इमारत २१.६७ कोटी, शेंडापार्क येथील शवविच्छेदनगृह विभागाची इमारत ७.०० कोटी, अंतर्गत रस्ते, बांधीव गटर, व फुटपाथ बांधणे, वाहनतळ इत्यादी १४.६८ कोटी, अग्निशमन यंत्रणा ३.८२ कोटी, इत्यादी कामांचा समावेश आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय परिसरात सुरु असलेल्या कामांचेही लोकार्पण होणार आहे यात विविध इमारतीची दुरुस्ती, रस्त्यांचे नुतनिकरण, ड्रेनेज दुरुस्ती इ. चे दुरुस्ती व नुतनीकरण करण्याचे काम ४३ कोटी रू. या कामाचा समावेश आहे.

सीपाआर मधील हृदयशस्त्रक्रिया विभाग / सीव्हीटीएस विभागाचे संपूर्ण अद्ययावतीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. एचआव्ही, हीपीटाटीस बी, क, ड इ. अद्ययावत पध्दतीने रक्त तपासणी करण्याकरीता आवश्यक नॅट यंत्राचे मशिन लोकापर्ण झालेले आहे. रुग्णालयामध्ये नवीन व अद्ययावत कॅथलॅब मशीन लवकरच येणार आहे. रुग्णालयामध्ये ट्रॉमाकेअर सेंटर विभाग, अतिदक्षता विभाग, क्षय व उरोरोग विभाग, डायलेसिस विभाग अपघात विभाग,नवजात शिशु विभाग व बर्न विभाग यांचे संपूर्ण अद्ययावतीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. नेत्र शल्य चिकित्साशास्त्र विभाग व फिजिओथेरेपी विभागाचे संपूर्ण अद्ययावतीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागामध्ये मॉडीलर ओटी बनविण्याचे काम प्रगती पथावर आहे. या सर्व प्रकल्पांकरीता रक्कम रु ३७१.०० कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे.