कोल्हापूर :आपल्या कार्यातून जगभरातील नाविन्यतेमध्ये योगदान देणाऱ्या लंडन येथील रेवेन्सबोर्न विद्यापीठातील वरिष्ठ व्याख्यात्या व कसबा बावड्याच्या सुकन्या वैभवी विजय चव्हाण यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (पीएमआय) ने २०२४ मधील विकासप्रिय उगवत्या युवा नेतृत्व म्हणून पहिल्या ५० जणांच्या यादीत स्थान दिले आहे. चव्हाण यांच्या या जागतिक स्तरावरील सन्मानामुळे कोल्हापुरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
वैभवी चव्हाण या मुळच्या कसबा बावडा येथील रहिवाशी आहेत. सध्या त्या लंडनच्या रेवेन्सबोर्न विद्यापीठामध्ये वरिष्ठ व्याख्यात्या म्हणून कार्यरत आहेत. जगभरातील विविध क्षेत्रातील ३५ वर्षाखालील तरुण आपल्या प्रकल्पांद्वारे नवकल्पनांना चालना देत आहेत. अशा जगभरातील तरुणांच्या यादीत वैभवी चव्हाण यांनी पहिल्या ५० जणांच्या यादीत स्थान पटकाविले.
पीएमआयने हेल्थकेअरपासून बांधकाम, इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशन ते शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांची यादी तयार केली. यासाठी पीएमआयने जगभरातील तरुणांच्या कार्याची पडताळणी करण्यासाठी विशेष समिती नेमली होती. या समितीने तपासणी करुन उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५० जणांचा या यादीत वैभवी चव्हाण यांचा समावेश केला.
वैभवी चव्हाण या पन्हाळ्यातील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी असून कसबा बावड्यातील डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. ॲडव्होकेट विजय चव्हाण यांच्या कन्या आहेत.
डॉ.डी.वाय.पाटील ग्रूपचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांचे सहकार्य लाभले.