कुंभोज (विनोद शिंगे)
विठु माऊलीचा अखंड नामजप, टाळ-मृदुगांचा निनाद, हजारो पताका आणि भक्तीरसात न्हाऊन निघालेली वस्त्रनगरी अशा भक्तीमय वातावरणात तब्बल 10 हजार महिलांच्या उपस्थितीत ‘न भूतो न भविष्यती’ असा हरिपाठ पठण आणि भव्य असा दिंडी सोहळा इचलकरंजीवासियांना ‘याची देही याची डोळा’ अनुभवास मिळाला. निमित्त होते ज्ञानेश्वरी परिष्करण (शुध्दीकरण) दिनाचे आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व डॉ. राहुल आवाडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री काळामारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने हा अनोखा सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने प्रती पंढरी वारीची अनुभूतीच इचलकरंजीत पाहण्यास मिळाली.
ज्ञानेश्वरी परिष्करण (शुध्दीकरण) दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार घरोघरी पोहचावेत आणि समाज सृजनशील, निकोप विचारांचा व व्यसनमुक्त व्हावा यासाठी काळामारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व डॉ. राहुल आवाडे यांच्या माध्यमातून एकाचवेळी तब्बल 10 हजार महिलांच्या उपस्थितीत इचलकरंजी येथे रविवार संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ सामुदायिक पठण व भव्यदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, हभप सदाशिव उपासे महाराज, आमदार प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, डॉ. राहुल आवाडे, मौश्मी आवाडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पुजन करुन दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच इचलकरंजीत भव्यदिव्य प्रमाणात हा सोहळा संपन्न झाला. संपूर्ण वस्त्रनगरी विठ्ठलनामाच्या गजरात तल्लीन झाली होती.
दिंडी सोहळ्यात बालचमूंसह अबालवृध्द, तरुणी, महिला संत महात्म्यांच्या पारंपारिक वेषभूषेत सहभागी झाले होते. असंख्य महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेतली होती. तर हजारो पताका आणि 151 पखवाजाने वातावरणात वेगळाच रंग भरला होता. पंढरीच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधत होती. त्याचबरोबर रथामध्ये संतांच्या वेशभूषेतील बालचमू विराजमान होते. तब्बल पाच किलोमीटर लांबीच्या या दिंडीचे पहिले टोक महात्मा गांधी पुतळा येथे शेवटचे टोक केएटीपी मैदान येथे होते. या सोहळ्यात शहर व परिसरातील सर्वच भागातील भजनी मंडळ, महिला, वारकरी सांप्रदयातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, श्री शिवतीर्थ, कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, सुंदरबाग मार्गे श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौक येथे आल्यानंतर याठिकाणी प्रसाद वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी सपना आवाडे, स्वप्निल आवाडे, वैशाली आवाडे, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, सुनिल पाटील, काळा मारुती आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष नंदू पाटील, श्रीकांत टेके त्याचबरोबर सर्वश्री हभप महादेव चौगुले, सचिन पाटील, तानाजी लोहार, नेतले महाराज, बाळासाहेब धर्माधिकारी, राजाराम शिंदे सरकार, कुबेर महाराज, पंढरीनाथ आवळे, आण्णासाहेब पाटील महाराज, सुभाष तोडकर, किशोर मेटे उपस्थित होते. या सोहळ्यासाठी काळामारुती आरती भक्त महिला मंडळाच्या वैशाली गजगेश्वर, काजल तोडकर, शितल रेडेकर, सुनिता पाटणकर, शशिकला, गायकवाड, सविता माने, अर्चना परदेशी, राधिका बुचडे व सहकार्यांनी परिश्रम घेतले.