डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान ; संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)

अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या २% संशोधकांच्या यादीत संजय घोडावत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संभाजी पवार यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, डॉ. पवार यांनी २०२० पासून सलग पाच वर्षे, हे स्थान कायम राखले आहे. या प्रतिष्ठेच्या यशामुळे संजय घोडावत विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर अधिक उजळले आहे.

डॉ. पवार यांनी आधुनिक पदार्थ विज्ञान आणि अ‍ॅप्लाइड फिजिक्स या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी आतापर्यंत १५० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले असून, जागतिक पातळीवरील ३०४७३८ संशोधकांमध्ये ३०४१वा क्रमांक मिळवला आहे. हे त्यांच्या कर्तृत्वाचे आणि अथक परिश्रमांचे प्रतीक आहे.

याव्यतिरिक्त, भारत सरकारकडून डॉ.पवार यांना एक विशेष प्रकल्प मिळाला आहे, ज्यात कार्बन डाय-ऑक्साइडचे इंधन (इथेनॉल, मिथेनॉल) तयार करण्यासाठी वापर करण्याचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे जागतिक ऊर्जा संकटावर मात करण्यात भारताच्या प्रयत्नांना नवा आयाम मिळणार आहे.

डॉ. पवार यांनी सुपरकॅपेसिटर, पाण्याचे विघटन, सौरघट, आणि ऊर्जा साठवणूक तंत्रज्ञान या क्षेत्रांत भरीव संशोधन केले आहे, ज्यामुळे अनेक तांत्रिक सुधारणा व उपकरणांच्या विकासात मोलाची भर पडली आहे.विश्वस्थ विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनीही डॉ. पवार यांचे अभिनंदन केले आहे.

संजय घोडावत यांनी डॉ. पवार यांचे अभिनंदन करताना सांगितले,डॉ. पवार यांचे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे संशोधन कार्य सतत पुढे जात आहे, आणि त्यांचे यश आमच्या शैक्षणिक व संशोधन कार्यात भरीव योगदान देत आहे.

कुलगुरू डॉ. भोसले म्हणाले, डॉ. पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाचे संशोधन कार्य अधिक गतीने पुढे जाईल आणि नव्या वैज्ञानिक शोधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.डॉ. पवार यांचे हे यश त्यांचे अथक परिश्रम आणि संशोधनातील निष्ठेचे फलित आहे. त्यांचे यश नव्या संशोधकांना प्रेरणा देणारे आहे.