महिलेने दिलेल्या धमकीमुळे ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या !

मुंबई : उपनगरातील मुलुंड परिसरात विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करीन अशी महिलेने धमकी दिल्याने एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशाल दंड (वय 67) असे या व्यक्तीचे नाव आहे.

या प्रकरणातील आरोपी कुमकुम मिश्रा या मुलुंड पश्चिमेला असणाऱ्या मनीषा प्राईड इमारतीमध्ये राहतात. खुशाल दंड व त्यांच्यात पार्किंग वरून वाद झाला होता. यामध्ये कुमकुम ने दंड यांना मारहाण करीत धमकावले होते. तसेच तुमच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल करीन अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर खुशाल दंड प्रचंड अस्वस्थ झाले होते. या ताणातून त्यांनी मुलुंड रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेन खाली आत्महत्या केली.

या प्रकरणी दंड यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून कुमकुम मिश्राच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्ती केल्याचा गुन्हा मुलुंड पोलिसांनी दाखल केला आहे त्यानंतर कुमकुम मिश्राला अटक ही करण्यात आली होती. त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आल्याची माहिती पोलीसानी दिली.