कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एसटी बस बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अथक प्रयत्नांनी बस रस्त्याच्या कडेला घेण्यात आल्यावर वाहतूक कोंडीतून सुटका झाली.
एसटी महामंडळाच्या बस प्रवासातच बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना आज सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात घडली. एसटी बस (क्रमांक एमएच १४ बीटी ५०४१) ही रस्त्यातच बंद पडली. ही बस बंद पडताना पण अशी बंद पडली की, निम्मी स्टँडच्या आवारात आणि निम्मी स्टँडच्या बाहेर. त्यामुळे मागून येणाऱ्या सर्व गाड्या थांबत गेल्यामुळे रोड वरील ट्रॅफिक हे अर्धा किलोमीटरपर्यंत थांबून होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.
एसटी बसेस या अधून मधून बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एसटी बसेस पूर्णपणे दुरुस्त करून, ती चालविण्यास योग्य आहे का? हे तपासून पाहणे आवश्यक आहे. तसेच एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर बंद पडणार नाहीत, याकडे आगार व्यवस्थापनाने लक्ष देणे आवश्यक आहे.