कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे
गेल्या अनेक दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्हा बँक वाचावी व शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळावी यासाठी संघर्ष करत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा शब्द सहकार मंत्री अतुल सावे व पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला होता. परंतु गेले दोन वर्ष शासनाने याकडे दुर्लक्ष केले. राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.
परंतु यावर काहीही पावले शासनाने उचलली नाही. म्हणून राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेला राज्य शासनाने मदत करण्याची मागणी केली आहे.
नाशिक जिल्हा बँकेतील साधारणता तीस हजार शेतकरी हे भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. घेतलेल्या कर्ज पेक्षा अनेक पटीने व्याज झाल्यामुळे त्यांना कर्ज फेड करणे शक्य नाही. शासनाने विशेष मदत केल्याशिवाय या शेतकऱ्यांना कर्ज मुक्ती मिळणार नाही. या शेतकऱ्यांना भूमीहीन होण्या पासून वाचवायचे असेल तर शासनाने जिल्हा बँकेला विशेष मदत केली पाहिजे ही सातत्याने मागणी होते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील अनेकदा बैठका झाल्या. परंतु यावरती मार्ग निघाला नाही. नुकतेच राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशी गळ घातली. निवडणुकीच्या तोंडावर नाशिक जिल्हा बँकेला मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्हा बँकेला आम्ही मदत करणार असे आश्वासन दिले आहे.